पाहुण्यांच्या सत्काराला देणार फळबियांची बॅग, मराठवाडा साहित्य संमेलनाचा अनोखा उपक्रम

| Updated on: Sep 22, 2021 | 2:35 PM

हिंगोली जिल्ह्यातील निसर्गशाळा उपक्रम राबवणारे पर्यावरण प्रेमी आणि उपक्रमशील शिक्षक अण्णा जगताप यांनी पाहुण्यांना 250 बियांची बॅग सन्मान म्हणून देण्याची तयारी दाखवली.

पाहुण्यांच्या सत्काराला देणार फळबियांची बॅग, मराठवाडा साहित्य संमेलनाचा अनोखा उपक्रम
41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण डॉ. सुधार रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
Follow us on

औरंगाबाद: येत्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत होऊ घातलेल्या 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनात (Marathwada Sahitya Sammelan, Aurangabad) साहित्यिक, विचारवंत, कवयित्री, राजकीय नेते, सार्वजनिक कार्यकर्ते यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यानिमित्त आलेल्या पाहुण्यांचा अनोख्या पद्धतीने सत्कार करण्याचे नियोजन आयोजकांनी केले आहे. संमेलनात हजेरी लावणाऱ्या पाहुण्यांना 250 फळबियांची बॅग दिली जाणार आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचे संगोपन करण्याचा संदेशच आयोजकांमार्फत दिला जात आहे.

पर्यावरणप्रेमी अण्णा जगताप पुरवणार बॅग

मराठवाडा साहित्य संमेलनाच्या या आयोजनात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याची कल्पना आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ.कैलास अंबुरे यांनी मांडली. हिंगोली जिल्ह्यातील निसर्गशाळा उपक्रम राबवणारे पर्यावरण प्रेमी आणि उपक्रमशील शिक्षक अण्णा जगताप यांनी पाहुण्यांना 250 बियांची बॅग सन्मान म्हणून देण्याची तयारी दाखवली. या सीडबॅगमध्ये चिंच, रामफळ, सीताफळ, हदगा, आवळा, बिबवा, भद्राक्ष, बेल, गुंज अशा अनेक प्रकारच्या बियाणांचा समावेश असेल.

दो गज की दूरी, मास्क है जरुरी

गेल्या वर्षी संमेलनाचे आयोजन केले होते, त्या काळात कोरोनाचा प्रचंड फैलाव होता. त्यामुळे ठरलेले मराठवाडा साहित्य संमेलन रद्द करावे लागले. मात्र यंदा कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यामुळे यावर्षी मराठवाडा साहित्य परिषदेने संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील दिली आहे. संमेलनात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक असेल. मास्कशिवाय सभागृहात प्रवेश देण्यात येणार नाही, अशी माहिती स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी दिली. तसेच फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी दोन खुर्च्यांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उद्घाटनाला अशोक चव्हाणांची उपस्थिती

25 सप्टेंबर रोजी म्हणजेच संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी 9.30 वाजता 40 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार बाबू बिरादार हे असतील. तर दुसऱ्या दिवशी दुपारी चार वाजता राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा समारोप होईल.

कथाकथन, परिसंवाद, चर्चासत्रांची मेजवानी

शनिवारी दुपारी दोन ते पाच या वेळात कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी तडेगावकर असतील. यात मान्यवर कवी सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक आदी विषयांवर विविध शैलीतील कविता सादर करतील. यानंतर पाच ते संध्याकाळी सात या वेळेत विचारवंत जयदेव डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता आज शून्यावर आली आहे’ या विषयावर पहिला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. तर याच दिवशी दुसऱ्या सभागृहात ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’ या विषयावर परिसंवादाचे दुसरे पुष्प गुंफले जाईल. यात दीपा क्षीरसागर, राम रौनेकर, रवींद्र बेंबरे, संजय जगताप आणि मोहीब कादरी हे सहभागी होतील. याच दिवशी रात्री 7 ते 9 दरम्यान ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नाट्यप्रयोग सादर केला जाईल. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 26 सप्टेंबर रोजी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांची प्रकट मुलाखत रवींद्र तांबोळी, गजाजनन जाधव, पृथ्वीराज तौर घेतील. सकाळी साडे अकरा वाजता ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी’ या विषयावर तिसरा परिसंवाद घेतला जाईल. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. ना.गो. ललिता गादगे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मराठी लेखिका-कवयित्रींचे लेखन स्त्रीवादात अडकले आहे’ या विषयावर परिसंवाद होईल. यात भगवान काळे, समिता जाधव, योगिनी सातारकरपांडे, शिवराज गोपाळे, महेश मंगनाळे यांचा सहभाग असेल. तर दुपारी दीड ते साडेतीन या काळात दिगंबर कदम यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथनाचा कार्यक्रम होईल.

इतर बातम्या- 

प्राजक्त देशमुख यांच्या ‘देवबाभळी’ पुस्तकाला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे; राज्यापालांच्या उपस्थितीत ग्लोबल लिटररी फेस्टिवलचे उद्घाटन