होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न; मनोज जरांगे पाटील विरोधकांवर संतापले

महिलेसोबतच्या फोटोवरून झालेल्या बदनामीवर मनोज जरांगे पाटील संतप्त झाले आहेत. "होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न," असे म्हणत त्यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. मराठा समाजातील महिलांची बदनामी थांबवा, असे आवाहन करत त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधला. समाजातील आया-बहिणींचा आदर करण्याचे आवाहन करत त्यांनी राजकीय टीकांना सणसणीत उत्तर दिले.

होय, आहे माझं लफडं, दे आणून, करतो लग्न; मनोज जरांगे पाटील विरोधकांवर संतापले
manoj jarange
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 27, 2026 | 11:30 PM

महिलेसोबतचा फोटो दाखवून मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी चांगलंच झापलं आहे. होय, आहे माझं लफडं. दे आणून. करतो लग्न, अशा शब्दात जरांगे यांनी विरोधकांवर संताप व्यक्त केला आहे. विरोधक तोंडाला येईल ते काहीही बरळत आहेत. उगाचच मराठा समाजातील भगिनींची बदनामी करत आहेत. तुम्हाला काही आया-बहिणी नाहीत का? तुम्ही मराठा समाजातील स्त्रीयांची बदनामी करत आहात, अशा शब्दात मनोज जरांगे यांनी जोरदार हल्ला चढवला.

मनोज जरांगे पाटील हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला. कर्जत येथील झाडांच्या कत्तलीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरलं. ते 33 कोटी झाडं लावणार आहेत. कुठे लावणार माहीत नाही. पण त्यांचंच सर्व खरं असतं. इथं कुणाचं काहीच खरं नाही. आपल्या क्लिप खोट्या, झाडं खोटी. एखाद्या दिवशी म्हणतील महाराष्ट्रात लोकच नव्हती, असं म्हणायला हे लोक बसले आहेत. लेकरं तरी तुमच्या आहेत म्हणा, असा सणसणीत टोला मनोज जरांगे यांनी लगावला.

Loading...

जनावरांना पाणी…

काहींनी तर माझं लफडं आहे म्हणून टीका केली. फोटो दाखवले. तुम्ही म्हणताय ना माझे लफडे आहेत? तर हो, आहेत लफडे. काय करतो? मग दे आणून… करतो लग्न मी. घरात जनावराला पाणी पाजायला कोणी नाही. जनावरांना पाणी तरी पाजेल, असा उपरोधिक टोलाही त्यांनी हाणला.

आईबहिणींबद्दल असेच म्हणाल का?

सर्व देशाचे पासपोर्ट माझ्याकडे आहेत. महाराष्ट्र, गोवा, उत्तर प्रदेश, बीड, जालना, अंतरवलीचा पासपोर्ट आहे, तुक्याच्या वाडीचा , नारबाच्या वाडीचा, सिंधुदुर्गाचा पासपोर्ट माझ्याकडे आहेत. हे पण देशच आहेत ना? मोदी या देशातून पैसे घेऊन येतील आणि लोकांना 15-15 लाख रुपये वाटून टाकतील. मी पैसा लपवला, माझ्याकडे पदही आहेत. तेही लपवून ठेवले आहे. माझे लफडे आहेत. जाऊन शोधा चपलांनीच हाणतील. अरे काय हे… तुम्हाला आई असेल, बहीण असेल, चुलत्या, काक्या असतील.. लोकांच्या लेकीबाळींबद्दल काही म्हणाल का? तुमच्या आई बहिणींबद्दल असंच म्हणाल का? असा सवाल त्यांनी केला.

त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ

समोरच्याने म्हटलं पाहिजे लफडं आहे म्हणून. जा कुणालाही विचारा जरांगे पाटलाशी लफडं आहे का? ज्या बाईला विचाराल ती चपलेने हाणेल. त्यांच्या घरचे कुऱ्हाडच घालतील. अरे काय हे? काहीही बोलाल का? लाखो करोडो भगिनींनी आंदोलनात फोटो काढले. त्यांच्याबद्दल काहीही म्हणाल? मराठ्याच्या महिलांच्या इज्जतीवर तुम्ही डाग लावता? आता यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्याव लागणार, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

परदेशात खाती आहेत ना?

तुमची परदेशात खाती असून तुम्हाला फॉरेन फंडिंग होत असल्याचा आरोप केला जात आहे, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरूनही त्यांनी शेलक्या भाषेत टीकाकारांना झापलं. आहेत ना? कशाला लपवून ठेवायचं? तुम्हाला काय खोटं बोलायचं? इथं एवढे पैसे मोजायचे कुठे? वावर नाही. दुसऱ्याच्या वावरात पैसे पुरले असते तर तोच हडप करेल. त्यामुळे परदेशात ठेवले. लांब ठेवले, असा उपरोधिक टोला जरांगे यांनी लगावला. इथून पुढे त्यांना असेच उत्तर द्यावे लागणार आहेत, असंही ते म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us