मनोज जरांगे यांचा दुसरा बॉम्ब, महाराष्ट्रात मोठी खळबळ; म्हणाले, आता दोन्ही पक्ष मिळून थेट…
मनोज जरांगे पाटील यांनी '500 कोटी' ऑडिओ क्लिप बॉम्बने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपमधून ५०० कोटी घेतल्याचा आरोप जरांगेंनी केला आहे. या गौप्यस्फोटानंतर दोन्ही पक्ष आपल्याला लक्ष्य करतील, असा दावा जरांगेंनी केला. मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली असून, जरांगे हे कट उधळून लावण्यास ठाम आहेत.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक ऑडिओ क्लिप महाराष्ट्राला ऐकवून भाजपला घाम फोडला आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपकडून मनोज जरांगे यांना देण्यासाठी 500 कोटी घेतल्याचं या क्लिपमध्ये भाजपचे लोक म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. क्लिप बॉम्बनंतर मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आता हे दोन्ही पक्ष मिळून माझ्या मागे हात धुवून लागणार आहेत, असा खळबळजनक दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे.
मुख्यमंत्र्यांनी त्या क्लिपची चौकशी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. चौकशीतून सत्य बाहेर येईल असं वाटतं. पण ते सत्य असल्याने दोन्ही पक्ष त्यांनाच वाचवण्याचा प्रयत्न करतील, अशी शंका आहे. अशी कुजबुज आहे की, दोन्ही पक्ष माझ्या मागे लागतील. कारण मी प्रचंड मोठं षडयंत्र उघडं पाडलं आहे. त्यामुळे आता ते एक होतील. माझ्या मागे लागतील. त्यांच्याकडून मोठा गुन्हा झाला आहे. पडद्यामागे गोरगरीब आणि मराठ्यांविषयी किती भयंकर प्लानिंग शिजतो, किती टोकाचा निर्णय घेतला जातो आणि प्रत्यक्षात समोर गोड बोललं जातं हे उघडं झालं आहे. पाठिमागे कट शिजवायचे हा साधा विषय नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
सर्वच बिथरले
आतापर्यंत केवळ पडद्यामागील प्लानिंग लोकांना ऐकायला मिळत होती. असं झालं असेल, तसं झालं असेल असा अंदाज लोक व्यक्त करायचे. पण या क्लिपच्या माध्यमातून खरं सत्य समोर आल्याने सर्वच बिथरले आहेत. मला संपवण्यासाठी हा कट रचला जात होता. जरांगेंना पैसे दिले, अमूक दिलं असं व्हायरल करायचं होतं. पण आपणच सत्य बाहेर आणल्याने त्यांना धरणी माय पाय ठेवायलाही जागा देत नाही, असं जरांगे म्हणाले.
मी त्यांना पुरून उरणार
त्यामुळे हे दोघे मिळून हे सत्य झाकण्यासाठी काहीही करू शकतील. सत्य झाकण्यासाठी दोघे मिळून, दोन्ही पक्ष मिळून माझ्या मागे लागतील. ते सत्यच आहे. सत्य स्विकारायला वाघाचं काळीज लागतंय. यांना सत्य स्वीकारायचं नाही. त्यामुळे त्यांना नरेटिव्ह पसरवायचा आहे. पण मी त्यांचा फडशा पाडणार आहे. बोलणाऱ्या मागे कोण आहे, हे शोधणार आहे. फडणवीस आणि शिंदेंची लोकं हे करत आहेत. तेही शोधणार आहे. हे सर्व माझ्या विरोधात मागे लागतील. मी त्यांना पुरून उरणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.