Weather Report | औरंगाबादेत सकाळी 9 वाजताच पारा 29 अंशांवर, मराठवाड्याचा हवामान अंदाज काय?

प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवल्लेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मराठवाड्यातील उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Weather Report | औरंगाबादेत सकाळी 9 वाजताच पारा 29 अंशांवर, मराठवाड्याचा हवामान अंदाज काय?
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Mar 15, 2022 | 11:01 AM

औरंगाबादः मागील आठवड्यात ढगाळ वातावरणानंतर औरंगाबादच्या तापमानाचा पारा (Aurangabad Temperature) या आठवड्यात चांगलाच पुढे सरकू लागलाय. दिवसा प्रचंड गर्मी आणि रात्री काहीशी थंडी असं चित्र सध्या शहरात जाणवतंय. येत्या काही दिवसात शहराच्या तापमानात वाढ होणार असून आताच त्याचा प्रत्यय येतोय. आज मंगळवारी सकाळीच 9 वाजता शहराच्या तापमानाचा पारा 29 अंशांवर गेला. त्यामुळे दुपारपर्यंत वातावरण आणखी तापेल, असं वाटू लागलं. औरंगाबादप्रमाणेच मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या (Marathwada Weather Alert) तापमानातही हळू हळू वाढ होत आहे. पुढील दोन दिवसात उष्णतेचे प्रमाण (Heat Wave) वाढत राहिल आणि त्यानंतर त्यात काही प्रमाणात घसरण होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

औरंगाबाद सकाळीच @29 अंश

राज्यभरात सध्या उष्णतेची लाट सुरु असून त्याचा फटका औरंगाबाद आणि मराठवाड्यालाही बसत आहे. औरंगाबाद शहराचे सकाळचे तापमानच 29अंश सेल्सियसवर पोहोचले. सकाळी ऑफिसला आणि शाळा-कॉलेजला बाहेर पडलेल्या नागरिकांना भर दुपारचं ऊन आहे की काय असे जाणवू लागले. शहरातील दुपारपर्यंतचे तापमान 38 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे दुपारी रस्त्यावर नागरिकांची गर्दी काहीशी कमी जाणवत आहे.

उष्णतेची लाट कशामुळे?

गुजरात आणि राजस्थानमध्ये सध्या तापमान प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. तेथे उष्णतेची लाट सुरु असून उत्तर तसेच पश्चिमेकडील या परिसरातून उष्ण आणि कोरडे वारे उत्तर कोकणाच्या दिशेनं वाहत आहेत. त्यामुळे या परिसरातील जिल्ह्यांचे तापमान वाढले आहे. उष्णतेच्या लाटेच्या या झळा मराठवाड्यातील जिल्ह्यांनाही बसत आहेत.

मराठवाड्यातील जिल्ह्यांची स्थिती काय?

मागील आठवड्यात ढगाळ वातावरण अनुभवल्यानंतर आता मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्येही उष्णतेची लाट जाणवू लागली आहे. Accuweather.com या वेबसाइटनुसार, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत मंगळवारी तापमानाचा पारा कुठवर पोहोचलाय ते पाहुयात-
औरंगाबाद- 32 अंश सेल्सियस
जालना- 38 अंश सेल्सियस
परभणी- 39 अंश सेल्सियस
हिंगोली- 39 अंश सेल्सियस
उस्मानाबाद- 32 अंश सेल्सियस
लातूर- 37 अंश सेल्सियस
बीड- 38 अंश सेल्सियस
नांदेड- 40 अंश सेल्सियस

येत्या दोन दिवसात पारा वाढणार

दरम्यान, प्रादेशिक हवामान विभाग मुंबईने वर्तवल्लेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस मराठवाड्यातील उष्णतेची लाट कायम राहणार असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. वातावरणात प्रखर ऊन नसले तरीही गर्मी आणि उष्णता मोठ्या प्रमाणावर वाढेल, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी लिंबू सरबत, फळांचा रस आदींचे सेवन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर बातम्या-

हमालांच्या मानधानाचा प्रश्न चिघळला, वखार महामंडळासमोर 37 ट्रकमध्ये धान्य पडून, काय आहे नेमके प्रकरण?

देवाची आरती, देव मला पावती! वोवालूया! संकासूराबरोबर पारंपरिक नाच, शिमगोत्सवात कोकणाच्या वैभवाचे दर्शन