Aurangabad | मनसे आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच, भोंग्यांचा आवाज येताच 100 नंबरवर कॉल्सचा पाऊस!

भोंगे वाजवऱ्या मशिदींना पोलिसांनी नोटीसी द्याव्यात, अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी प्रकाश महाजन हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत.

Aurangabad | मनसे आंदोलनाचा दुसरा टप्पा लवकरच, भोंग्यांचा आवाज येताच 100 नंबरवर कॉल्सचा पाऊस!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 05, 2022 | 11:09 AM

औरंगाबादः 04 मे रोजी मशिदींवरील भोंगे हटवले पाहिजे अशी भूमिका घेत मनसेनं (MNS)  केलेल्या आंदोलनाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक मशिदींमध्ये कमी आवाजात नमाज पठन झाले. तर काही मशिदींवरील भोंगेही खाली काढण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र मनसेचं हे आंदोलन एका दिवसापुरतं मर्यादित नाही तर कायमचाच हा इशारा असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा दुसरा टप्पा आता लवकरच सुरु होणार असल्याचं सांगतिलं जात आहे. भोंग्यांचा (Loud speakers) आवाज येताच पोलिसांच्या कंट्रोल रुमवर फोन कॉल्सचा पाऊस पडणार आहे. मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी अशा प्र्कारच्या भोंग्यांवर लक्ष ठेवून असतील आणि मर्यादेबाहेर आवाज येताच पोलिसांना कळवण्यासाठी 100 क्रमांकावर फोन कॉल करून त्रासाची तक्रार देतील, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे मनसेच्या या आंदोलनाच्या नव्या टप्प्यासाठी पोलिसांनाही सज्ज रहावे लागणार आहे.

प्रकाश महाजन काय म्हणाले?

मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन हे औरंगाबाद मनसे कार्यकर्त्यांसोबत असून शहरातील भोंग्यांवर त्यांचे बारीक लक्ष आहे. आज 05 मे रोजीदेखील काही मशिदींवर सकाळी पाच वाजता माइकवरून अजान सुरु झाली. त्यावेळी आम्ही पोलिसांना तत्काळ मेसेज करून याबद्दलची सूचना दिल्याचं प्रकाश महाजन यांनी सांगितलं. तसंच शहरातील काही अनधिकृत भोंग्यांवर कारवाईची मागणी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना भेटण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. भोंगे वाजवऱ्या मशिदींना पोलिसांनी नोटीसी द्याव्यात, अशी मनसेची मागणी आहे. त्यासाठी प्रकाश महाजन हे औरंगाबाद पोलीस आयुक्तांना भेटणार आहेत.

‘एमआयएमच्या सभेला हरकत नाही’

दरम्यान, येत्या 08 जून रोजी शिवसेना औरंगाबादेत सभा घेणार आहे. मनसेनंतर शिवसेनेनं सभा घेतली तर एमआयएमदेखील मागे राहणार नाही, अशी भूमिका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली आहे. आम्हीदेखील त्याच मैदानावर दुप्पट गर्दी जमवू. त्या ठिकाणी खुर्च्या न टाकता मराठवाडा सांस्कृतिक मैदान खचाखच भरवून दाखवू, मग बघू आम्हाला कोण अडवतंय, असं आव्हान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलं आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन म्हणाले की, असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील हे दोघेही उत्तम बोलतात. ते उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यामुळे त्यांनी औरंगाबादमध्ये सभा घेण्यास आमची काहीही हकरत नाही.’ त्यामुळे औरंगाबादमध्ये येत्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरातील प्रमुख पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि शक्तीप्रदर्शनामुळे वातावरण तापण्याची चिन्हं आहेत.