औरंगाबादेत महाराष्ट्र बंदचा फज्जा, कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी, शहरातील काही दुकानेच बंद

| Updated on: Oct 11, 2021 | 11:29 AM

औरंगाबादमधील व्यापारी संघटनांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचे आधीच जाहीर केले होते. आज सकाळीच औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील दुकाने सुरु करण्यात आली. बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि खरेदी-विक्रेत्यांची गर्दी दिसून आली.

औरंगाबादेत महाराष्ट्र बंदचा फज्जा, कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी, शहरातील काही दुकानेच बंद
औरंगाबादमधील कृउबामध्ये नेहमीप्रमाणे गर्दी तर ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद आहे.
Follow us on

औरंगाबाद: महाविकास आघाडीने उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणी पुकारलेल्या राज्यव्यापी बंद (Maharashtra Bandh) चा औरंगाबादमध्ये मात्र फज्जा उडालेला दिसत आहे. औरंगाबादमधील व्यापारी संघटनांनी या आंदोलनात सहभागी न होण्याचे आधीच जाहीर केले होते. आज सकाळीच औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजारसमितीतील दुकाने सुरु करण्यात आली. बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि खरेदी-विक्रेत्यांची गर्दी दिसून आली.

औरंगाबाद कृउबा मध्ये रोजसारखीच गर्दी

महाविकास आघाडीने राज्यभरात बंद चे आवाहन केले असतानाही औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत याला शून्य प्रतिसाद मिळालेला दिसून आला. 11 ऑक्टोबर रोजी सकाळीच नेहमीप्रमाणे बाजार समितीत ग्राहक तसेच खरेदी-विक्रेत्यांची मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी रोजच्या प्रमाणेच दुकाने उघडून आपापले व्यवहार सुरू केले.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडीच

औरंगाबादच्या जिल्हा व्यापारी महासंधाने सोमवारचत्या बंदला पाठिंबा नसल्याचे कळवले होते. कोणत्याही प्रकारच्या राजकीय बंद मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय महासंघाने घेतलेला आहे. मात्र काही व्यापाऱ्यांना स्वच्छेने बंद मध्ये सहभागी व्हायचे असेल तर तो त्यांचा ऐच्छिक निर्णय असेल, असे महासंघाकडून कळवण्यात आले होते. त्यामुळे आजच्या बंदमध्ये औरंगाबाद शहरातील किराणा दुकान, भाजी विक्रेत्यांचे ठेले, मेडिकल आदी सेवा नेहमीप्रमाणेच सुरु असल्याचे चित्र पहायला मिळाले.

शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात

महाविकास आघाडीच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण पोलीस विभागानेही तयारी केली आहे. सोमवारी सकाळपासूनच शहराच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा पहायला मिळाला. शहरातील गुलमंडी परिसरात सकाळपासून पोलीसांच्या तुकड्या तैनात आहेत.

शहर व जिल्ह्यातील रिक्षांचा बंद

सोमवारच्या बंदला औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील रिक्षाचलक संघटनांचा पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार शहरातील बहुतांश रिक्षांनी आज या बंद ला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामीण भागात बंदला प्रतिसाद

औरंगाबादच्या ग्रामीण भागात मात्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागातील दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहेत. शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या पैठण तालुक्यातील गावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

इतर बातम्या-

Aurangabad: जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळे खुली, 10 ऑक्टोबरपासून सर्व वयोगटातील नागरिकांना प्रवेश