बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, अर्धा तास कोणालाही भेटण्यास मनाई!

माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. सध्या पुढच्या अर्धा तास त्यांना कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे.

बच्चू कडू यांची प्रकृती खालावली, अर्धा तास कोणालाही भेटण्यास मनाई!
bacchu kadu
| Updated on: Jun 11, 2025 | 4:36 PM

Bacchu Kadu Hunger Strike : गेल्या काही दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन करत असलेल्या माजी मंत्री बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे. ते सध्या आंदोलनस्थळीच असून त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुढच्या अर्धा तास कोणालाही भेटण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चू कडू यांची प्रकृती नेमकी कशी आहे? त्यांना नेमका काय त्रास होतोय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शेतकरी, कार्यकर्ते गुरुकुंज मोझरी येथे दाखल

दुसरीकडे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते अमरावती शहरात दाखल होत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरीदेखील बच्चू कडू यांच्या गुरुकुंज मोझरी येथील उपोषणस्थळी जमा होत आहेत. असे असताना बच्चू कडू यांची प्रकृती खालावली आहे.

मनोज जरांगेंनी घेतली बच्चू कडू यांची भेट

बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चालला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आज (11 जून) बच्चू कडू यांची भेट घेतली आहे. या भेटीत जरांगे यांनी कडू यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सरकारने बच्चू कडू यांच्या मागणींकडे लक्ष द्यायला हवे. त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात, असे मत व्यक्त केले.

तोपर्यंत अन्नाचा कण खाणार नाही- बच्चू कडू

दुसरीकडे बच्चू कडू यांनी काहीही झालं तरी मी अन्नाचा एकही कण खाणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. जोपर्यंत माझ्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मी माघार घेणार नाही. काहीही झालं तरी मी अन्नाचा कण खाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. त्यांच्या या भूमिकेमुळे 10 जून रोजी 2 किलो वजन कमी झाले होते. आज तर त्यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर कार्यरत आहेत. त्यांनीच पुढचा अर्धा तास बच्चू यांची कोणालाही भेट घेता येणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितलेले आहे.