शरद पवार यांच्यावर बच्चू कडू यांचा सर्वात मोठा आरोप; मराठा आरक्षणावर नवा दावा काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत का आहोत? याचा खुलासा बच्चू कडू यांनी केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे म्हणूनच मी त्यांच्या सोबत गेलो. ते मुख्यमंत्री नसतील तर आम्ही नाही आहे हे स्पष्ट आहे. त्यात काहीच लपवायच नाही, असं बच्चू कडू यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. त्यांच्यापाठी महायुती भक्कम आहे. मुख्यमंत्री बदलणार नाही आणि बदलण्याचं काही कारणही नाही, असंही ते म्हणाले.

शरद पवार यांच्यावर बच्चू कडू यांचा सर्वात मोठा आरोप; मराठा आरक्षणावर नवा दावा काय?
Bacchu Kadu and Sharad Pawar
| Updated on: Nov 10, 2023 | 2:29 PM

स्वप्नील उमप, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, अमरावती | 10 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. हे आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. बच्चू कडू यांनी मराठा आरक्षणावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरच मोठा आरोप केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बच्चू कडू यांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

शरद पवार मुख्यमंत्री असताना 52 ओबीसीच्या जाती निर्माण करण्यात आल्या होत्या. तेव्हाच त्यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये घेतलं असत तर भानगड राहली नसती. तेव्हा पवार साहेबांनी ओबीसीचे हित जोपासले. जेव्हा जनगणना झाली तेव्हा ओबीसींमध्ये मराठ्यांना घेतलं होतं, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला आहे. केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणाचा कोठा वाढवला पाहिजे. मराठा हा ओबीसीमधेच आहे. त्यांना त्याचा फायदा दिला पाहिजे, असंही ते म्हणाले.

वणवा पेटला, किटली गरम करत आहेत

ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला. त्यापेक्षा आरक्षण कसं वाढेल हा विचार केला पाहिजे. आरक्षणाचा वणवा पेटला आहे. त्यात सर्वजण आपली किटली गरम करत आहेत. तो चहा समाजाला मिळणार नाही. हे लोक स्वत: पिणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

वडेट्टीवारांना आव्हान

यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही टीका केली. मराठा हा कुणबी नाही तर कोण आहे हे वडेट्टीवार यांनी सांगावं. विदर्भातील मराठा कुणबी चालतो. मग मराठवाड्यातील का चालत नाही? 50 मराठा तरुणांनी आत्महत्या केल्या. ही अभिमानाची गोष्ट नाही. तुम्हाला ओबीसी नेते व्हायचं आहे तर व्हा. आणखी काही कार्यक्रम करायचा असेल तर करा. पण मराठ्यांच्या आरक्षणाच्या आड येऊ नका, असं सांगतानाच बोगस नोंदी होत आहेत, असा काही लोक आरोप करत आहे. पण ते तर सर्व हस्तलिखित आहे. बोगस नोंदीचा प्रश्न येतो कुठे? असा सवाल त्यांनी केला.

ते ओबीसीच आहेत

24 तारखेपर्यत शिंदे समितीने अहवाल द्यायचा आहे. पुण्यात 75 टक्के नोंदी सापडल्या आहेत. ही मोठी गोष्ट आहे. कुणबींच्या नोंदी सापडत असल्याने मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागू शकतो. त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो, असं सांगतानाच मराठा म्हणून वेगळं आरक्षण मिळणार नाही. ते ओबीसीच आहेत, असा दावाही त्यांनी केला.