Malegaon Sugar Factory Rate: बारामतीमध्येही कोल्हापूर पॅटर्न! ‘माळेगाव’ची पहिली उचल जाहीर, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
कोल्हापूरप्रमाणे सातारा, सांगली जिल्ह्यामध्येही ऊसाला प्रतिटन 3900 रुपयांची पहिली उचल जाहीर झाली आहे. अशातच आता बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सत्ता असलेल्या माळेगाव साखर कारखान्यानेही ऊस दर जाहीर केले आहेत.

विक्रम वरे प्रतिनिधी: महाराष्ट्रात सध्या ऊसदराचा मुद्दा गाजत आहे. शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसाला विक्रमी 3900 रुपयांची ऊचल देण्याची मागणी करत तीव्र आंदोलन छेडले त्याला यशही आले. त्यामुळेच कोल्हापूरप्रमाणे सातारा, सांगली जिल्ह्यामध्येही ऊसाला प्रतिटन 3900 रुपयांची पहिली उचल जाहीर झाली आहे. अशातच आता बारामतीमध्ये दिवंगत नेते अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची सत्ता असलेल्या माळेगाव साखर कारखान्यानेही ऊस दर जाहीर केले आहेत.
माळेगाव कारखान्याची पहिली उचल जाहीर!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार चेअरमन असलेल्या माळेगाव सहकारी कारखाना किती उचल देणार याबाबत शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता होती. आज माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पहिली उचल दर जाहीर झाला आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामात तुटून येणाऱ्या उसासाठी पहिली उचल ३,९०० रुपये प्रतिटन जाहीर करण्यात आली आहे
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील ऊसाच्या दराबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अशातच कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पहिली उचल ३,९०० रुपये प्रतिटन निश्चित करण्यात आल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सातारा, सांगलीमध्येही कोल्हापूर पॅटर्न!
यंदा कोल्हापुरमध्ये सर्वप्रथम ऊसाला प्रतिटन 3900 रुपयांची पहिली उचल जाहीर झाली होती. त्यापाठोपाठ सातारा, तसेच सांगली जिल्ह्यामधील साखर कारखान्यांनीही हाच पॅटर्न राबवत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. सोबतच बारामती तालुक्याचे शेजारी असलेल्या फलटणमधील कारखान्यांनीही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत तब्बल ३९०० ते ३९११ रुपयांपर्यंत पहिली उचल देण्याचे धाडस दाखवले. त्यामुळे साखर पट्ट्याचे नेतृत्व करणाऱ्या बारामती तालुक्यातील कारखाने किती दर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर आता माळेगावमध्येही शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सध्या बळीराजा दुष्काळामुळे त्रस्त आहे. दुसरीकडे रासायनिक खते, कीटकनाशके, मजुरी तसेच मशागतीचे दरही गगनाला भिडलेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. बारामतीमधील कारखाने हे श्रीमंत कारखाने मानले जातात, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला मोल मिळावे? असं मत शेतकरी व्यक्त करत होते. अखेर आता या दराने बळीराजाला दिलासा मिळाला आहे. ,