
बीडच्या पाटोदा तालुक्यातील मयुर नायगाव येथील शेतकरी मारूती वाघुले यांची अतिवृष्टी झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्याने झेंडुच्या झाडांसह जमीन खरडून गेली आहे. शेतीला केलेल्या पत्र्याच्या कंपाऊंडसह ठिबक देखील वाहून गेले आहे. शेतकऱ्याने माझी दोन मुलं शिकत असून त्यांचं शिक्षण कसं करायचं असा सवाल उपस्थित करत पंचनामा करून सरकारने काहीतरी मदत द्यावी अशी मागणी केली आहे. दसरा आणि दिवाळीला या झेंडूतुन पैसा येईल या अपेक्षेने 80 हजार रुपये खर्च करुन फुलांची ही बाग फुलवली. मात्र याच बागेचा बराचसा भाग वाहून गेला आहे तर जमीनही खरडून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यावर मोठं संकट ओढवलं आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील नांद्रे गावाला पुराचा मोठा तडाखा बसला. नांद्रे, सायगावला गावाला जोडणारा पूल, रस्ता वाहून गेल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल सुरु आहेत. गावातील नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती देखील मन्याडच्या प्रवाहात वाहून गेली आहे. मन्याड नदीवरील पूल वाहून गेल्याने सायगाव व नांद्रे या दोन्ही गावाचे दळणवळण ठप्प झाले आहे. नांद्रे गावातील शेकडो विद्यार्थी सायगावला शिक्षण घेण्यासाठी जातात.
पूर ओसरल्याने मोठा अनर्थ टळला
मात्र पूल,रस्ता वाहून गेल्याने शिक्षणावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. मन्याड धरणाने धोक्याची पातळी ओलांडली होती, गावाची संरक्षण भिंत देखील फुटण्याच्या मार्गावर होती.2021 ची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून नांद्रे गावातील 500 लोकांना स्थलांतरित केले होते.मात्र पूर ओसरल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
घरांची पडझड झाली
गावातील नदीकाठच्या घरांची पडझड झाली असून रस्ते, शेती, पूल वाहून गेले आहेत. पूर ओसरल्यानंतर नांद्रे गावात पुरामुळे झालेला विध्वंस पाहायला मिळत आहे.नांद्रे गावाला संरक्षण भिंत बांधून द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
54 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
मालेगाव तालुका अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील 54 हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान. 11 मंडळांमधील 96 हजार 481 शेतकऱ्यांचे नुकसान. ज्वारी, बाजरी, मका, भुईमुंग, सोयाबीन, डाळिंब, कापूस या पिकांचे नुकसान. महसूल व कृषी विभागाचा पंचनामा सादर. अजूनही काही पंचनामे सुरू आहेत. शेतात गुडघ्यांपर्यंत पाणी साचल्याने पिके पिवळी पडली.
दाभाडी, झोडगे, वडनेर, करजगव्हाण, कळवाडी, सौंदाणे, जळगाव, सायने, अजंग, डोंगराळे, निमगाव याठिकाणी 100% पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नुकसान मका पिकाचे झाले आहे.