Beed | कागदांच्या रकान्यांत माणुसकीचा खून, ‘हयात’ च्या खात्रीसाठी अर्धांगवायू ग्रस्ताला 2 तास ताटकळत ठेवलं, बीड प्रशासनाचा कारभार

| Updated on: Jul 30, 2022 | 4:59 PM

हा प्रसंग पाहून अंगावर शहारे आणि प्रशासना विरोधात चीड आल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेत असताना देखील प्रशासनाला पाझर का फुटत नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय.

Beed | कागदांच्या रकान्यांत माणुसकीचा खून, हयात च्या खात्रीसाठी अर्धांगवायू ग्रस्ताला 2 तास ताटकळत ठेवलं, बीड प्रशासनाचा कारभार
बीडमधील संजय गांधी विभागात लाभार्थीचे हाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीडः प्रशासनातील (Beed Administration) अधिकारी किती निगरगट्ट झालेत, याचा प्रत्यय बीडच्या तहसील कार्यालयामध्ये काल सायंकाळी पहावयास मिळाला. संजय गांधी निराधार योजनेतील (sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभार्थी हयात आहे की नाही? हे जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी एका अर्धांगवायूने त्रस्त झालेल्या लाभार्थ्याला कार्यालयात बोलून घेतले. सदर व्यक्ती तोच आहे का याची शहानिशा करण्यासाठी तब्बल दोन तास दारातच ठेवून घेतले. निगरगट्ट अधिकाऱ्याने (Beed Officers) दाखविलेल्या अमानवीय वागणुकीबद्दल सामाजिक स्थरातून संताप व्यक्त होतोय.  संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्याला महिन्याला एक हजार रुपयांचं मानधन मिळतं. मात्र ते मानधन मिळवण्यासाठी किती यातना सोसाव्या लागल्या, हे या व्यक्तीच्या व्हिडिओतून दिसतंय. हा व्हिडिओ सध्या बीडमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

काय आहे नेमकं प्रकरण?

आसाराम आठवले हे तीन वर्षांपासून अर्धांगवायूचे रुग्ण आहेत. त्यांना संजय गांधी निराधार योजनेतून शासनाचे महिन्याकाठी एक हजाराचे मानधन मिळते. मात्र मागील वर्षभरापासून त्यांना हे मानधन मिळालेलं नाही. बीड तालुक्यातील पाटेगाव येथे आठवले पत्नी, मुलगा आणि सुनेबरोबर वास्तव्यास आहेत. कुटुंबाने त्यांचा हयातनामा प्रशासन दरबारी दिला असला तरी प्रशासनाने मात्र या अवस्थेत देखील त्यांना बोलावून घेतलं. तब्बल दोन तास त्यांना नायब तहसीलदार अरविंद काळे यांच्या कार्यालयाच्या दारात ठेवण्यात आलंय. हा प्रसंग पाहून अंगावर शहारे आणि प्रशासना विरोधात चीड आल्याशिवाय राहणार नाही. या अवस्थेत असताना देखील प्रशासनाला पाझर का फुटत नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. या प्रकरणावर नायब तहसीलदारांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

‘संवेदनाहीन अधिकाऱ्यांना बडतर्फ करा’

अर्धांगवायूने अंथरणात खिळून असलेल्या रुग्णाला खरं तर प्रशासनाने बोलवायला पाहिजे नव्हते. प्रशासनातील एखादी व्यक्ती घटनास्थळी जाऊन खातरजमा करायला हवी होती, मात्र तहसिल प्रशासनाकडून अमानवीय आणि चीड आणणारे कृत्य घडले आहे. तब्बल दोन तास रुग्णाला दारात ठेवून प्रशासन नेमकी कसली माहिती घेत होते याची चौकशी झाली पाहिजे. शिवाय संवेदनाहीन अधिकारी अरविंद काळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष तात्या थोरात यांनी केली आहे.