
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणाची सीआयडी आणि एसआयटीची चौकशी सुरु असून या हत्येच्या कटात सहभागी असलेले विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे यांना अटक करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण ताजं असताना बीडमधील मारहाणीच्या घटना काही थांबायचं नाव घेत नाहीत. बीडमधील एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. तुझा संतोष देशमुख करु, असं म्हणत त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले.
बीड जिल्ह्याच्या तांदळवाडी तालुक्यातील भिल्ल येथील एका तरुणाला ‘तुझा आता संतोष देशमुख करू’ अशी धमकी देत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. कैलास सांगुळे असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. हा तरुण गाडी चालवत असताना भररस्त्यात चौघांनी पाठीमागून कोयत्याने त्याच्या शरीरावर सपासप वार केले. यात त्याच्या डोक्यावर, तोंडावर आणि मानेवर १० हून अधिक वार करण्यात आले. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर बीडमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतरही अद्यापपर्यंत पोलिसांत गुन्हा दाखल झाला नसून, आरोपी मोकाट आहेत, असा आरोप पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे. पीडित तरुणाचा भाऊ श्रीहरी सांगुळे यांनी याबद्दल आक्रोश व्यक्त केला आहे. “माझ्या भावाचं बरं-वाईट झालं तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील” अशी प्रतिक्रिया श्रीहरी सांगुळेंने दिली.
याप्रकरणी पोलिसांना तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. या मारहाणीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सहा महिने पूर्ण झाले आहे. मात्र तरीही फरार असलेल्या आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख ही मस्साजोग येथे रस्त्यावर बसून आंदोलन करणार आहे. याबाबतचे निवेदन धनंजय देशमुख यांनी तहसीलदारांना देण्यात आलं आहे.