
बीडः बीड मतदारसंघातील नवगण राजुरी ग्रामपंचायतच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होती. शिवसेना नेते काका जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar ) आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांची एका जागेसाठी प्रतिष्ठा पणाला लागली होती. नवगण राजुरी हे दोन्हीही क्षीरसागरांचे मूळ गाव आहे, त्यामुळे काका-पुतण्यात एका जागेवरून देखील चुरस निर्माण झाली होती. मात्र मतदारांनी पुतणे संदीप क्षीरसागर यांना पुन्हा एकदा कौल दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार वैशाली बहीर यांचा तब्बल 365 मतांनी विजय झाला आहे. या विजयानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबियाने विजयी उमेदवाराचे स्वागत केले. नवगण राजुरी येथील ग्रामपंचायत मधील एका सदस्याचा मृत्यू झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर झाली होती. ही जागा ताब्यात घेण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर आणि काका जयदत्त क्षीरसागर यांनी जोर लावला होता.
या जागेवर झालेल्या मतदानानंतर बुधवारी मतमोजणी झाली, त्यामध्ये वैशाली ज्ञानेश्वर बहिर यांनी 365 मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. विरोधी उमेदवाराला केवळ 123 मते मिळाली. राजुरी ग्रामपंचायतीवर आधीच आमदार संदीप क्षीरसागर यांचा ताबा आहे. त्या दरम्यान एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीत आमदार क्षीरसागर यांच्या उमेदवाराने मोठा विजय मिळविल्याने राष्ट्रवादीचे वर्चस्व पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध झाले आहे.
राजुरी जिल्हा परिषद आणि चौसाळा जिल्हापरिषद गटातील बाबू जोगदंड आणि वैजनाथ तांदळे यांच्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर यांना मोठे बळ मिळाले आहे. वैजनाथ तांदळे हे नुकतेच शिवसेनेचे शिवबंधन तोडून हातात ‘घड्याळ’ घातले आहे. त्यामुळे राजुरी येथील झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला याचा मोठा फायदा झाला आहे.
इतर बातम्या-