
महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 मराठी, बीड | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आलाय. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. त्यांनी आज सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. सरकारने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर उद्या संध्याकाळपासून पाणी पिणं बंद करणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय. तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. काही ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी रस्ता रोखत टायर जाळण्याचादेखील प्रकार समोर आलाय. बीडमध्ये तर आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे आज दिवसभर बीडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती. या संचारबंदीत उद्या सकाळपासून शिथिलता देण्यात येणार आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी याबाबत माहिती दिली. “उद्या सकाळी 6 वाजता संचारबंदीत शिथिलता केली जाईल. पण जिल्ह्यात जमावबंदी लागू असेल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बीड जिल्हा उद्यापासून पूर्वरत होणार”, असंही जिल्हाधिकारी म्हणाल्या आहेत.
“उद्या सकाळी सहा वाजता संचारबंदी शिथिल होणार आहे. मात्र जमावबंदी राहणार आहे. पाच पेक्षा जास्त जणांना एकत्रित येणे बंदी असेल. सर्व शाळा, महाविद्यालये, बसेस सुरू राहतील. इंटरनेट सुरू करण्याबाबत उद्या निर्णय घेणार आहोत”, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी दिली.
“कोणीही आरोप केले तरी आम्ही गुन्हेगारांवर कडक कारवाई करणार. तोडफोड आणि जाळपोळ झाल्यामुळे संचारबंदी लावावी लागली. संचारबंदीमुळेच उद्रेक कमी झाला”, असं जिल्हधिकाऱ्यांनी सांगितलं. “सीसीटीव्ही पाहून जो ट्रेस होईल त्यावर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. नागरिकांनी शांतता राखावी, कायदा कोणीही हातात घेवू नये”, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
दरम्यान, मराठा आंदोलना बीडमध्ये काल हिंसक वळण लागलं होतं. आदोलकांनी काल आमदार प्रकाश सोळंके यांच्या गाडीला आग लावली होती. त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर दगडफेक करत नंतर थेट आग लावली होती. मराठा आंदोलकांनी माजलगाव नगर परिषद फोडली होती. तसेच माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली होती. तसेच आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आंदोलकांनी आग लावली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप पक्षांच्या कार्यालय परिसरातही जाळपोळ केल्याची माहिती समोर आली होती. संबंधित परिस्थिती पाहता सरकारने बीड जिल्ह्यात जमावबंदीचा निर्णय घेतला होता.