खोक्यामुळे अडचणीत आले की अण्णा! हरणाचे मटण तर सुरेश धसांसाठीच, ओबीसी नेत्याने ठोकली बोंब

Khokya Bhosale MLA Suresh Dhas : सतीश भोसले उर्फ खोक्या, हा वाल्मिक कराडनंतर रडारवर आला आहे. वाल्मिकसारखीच दहशत पसरवण्याचे त्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे भाजप आमदार सुरेश धस अडचणीत आले आहे हे नक्की.

खोक्यामुळे अडचणीत आले की अण्णा! हरणाचे मटण तर सुरेश धसांसाठीच, ओबीसी नेत्याने ठोकली बोंब
Khokya Bhosale Suresh Dhas
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 08, 2025 | 2:33 PM

बीडमध्ये प्रत्येक टापूत एक दादा, भाऊ, भाई, आका आणि आकांचा आका समोर येत आहे. संतोष देशमुख यांची क्रूर आणि निर्दयीपणे हत्या करणारे आरोपी आणि त्यांचा आका वाल्मिक कराड हा राजकीय वरदहस्तामुळे मोठा गुंडा झाला. त्यापाठोपाठ आता बिळातून एक एक वाल्मिक बाहेर येत आहेत. शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसलेचे अनेक प्रताप समोर येत आहेत. त्याच्यामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आता आणखी एक गंभीर आरोप सुरेश धसांवर करण्यात आला आहे.

ओबीसी नेते टीपी मुंडे यांचा गंभीर आरोप

शिरूर तालुक्यातील सतीश उर्फ खोक्या भोसले याने मारलेल्या हरणांचे मटण सुरेश अण्णा धस यांना पोहोचत केले जाते. त्यामुळेच स‍तीश भोसले याच्यावरती गुन्हे दाखल होत नाहीत, असा खळबळजनक आरोप ओबीसी नेते टीपी मुंडे यांनी केला आहे. हा खोक्या आणि त्याचे साथीदार चार-दोन किलोचा डब्बा भरून सुरेश धसांना घेऊन जायचे असा आरोप त्यांनी केला.

असा प्रकार जर होत असेल तर स‍तीश भोसले वर कसा गुन्हा दाखल होईल, असा सवाल मुंडे यांनी केला. या गंभीर प्रकरणासंदर्भात वनमंत्र्यांना तर भेटणारच आहे. मात्र त्यांच्या बॉसला मुख्यमंत्री यांची मी विशेष भेट घेणार आहे. या मुद्द्यावर मी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे, अशी माहिती टी. पी. मुंडे यांनी दिली.

उद्या शिरूरमध्ये मोठा मोर्चा

हरण तस्करीमध्ये सुरेश धस यांनाही सहआरोपी करा. ते पण आकांचे आका आहेत. वाल्मिक कराड याच्यापेक्षा तर सुरेश धस यांच्यावर जास्त गुन्हे आहेत. हरीण, डुक्कर आणि अन्य वन्य प्राण्यांची तस्करी करण्यावर बंदी असताना तस्करी कशी केली जाते? असा सवाल करत मुंडे यांनी धसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी धस आणि खोक्या यांच्याविरोधात उद्या, 9 मार्च रोजी रविवारी शिरूर येथे मोठा मोर्चा काढणार असल्याचे टीपी मुंडे म्हणाले. दरम्यान त्यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद पण साधला.

पोलीस आणि वनविभाग ॲक्शन मोडवर

शिरूर कासारचा भाजप पदाधिकारी सतीश उर्फ खोक्या भोसले सध्या गुन्हे करून फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खोक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी आता वेगवेगळ्या कारवाया केल्या जात आहेत. शिरूर कासार पोलीस स्टेशन आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईतून स‍तीश उर्फ खोक्या भोसलेच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आहे.

त्याच्या घरातून पथकाने मेलेल्या प्राण्याचे वाळलेले मास जप्त केले आहे. साधारणपणे हे मास एका महिन्यापूर्वी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हे मास कोणत्या प्राण्याचे आहे हे फॉरेन्सिक लॅब मध्ये तपसानंतर स्पष्ट होणार आहेत. तसेच पोलिसांनी खोक्याच्या वस्तीवर आणि इतर घराची झाडाझडती घेऊन वन्य प्राण्याची शिकार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जाळ्या जप्त केल्या आहेत.