
Dhananjay Deshmukh Threat: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या जागी नवीन सरपंच निवडीचे काम सुरू झाले आहे. त्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या 28 एप्रिल रोजी पोट निवडणुकीत गावाचा नवीन कारभारी निवडल्या जाईल. पण त्यापूर्वी एक मोठी घडामोड समोर येत आहे. धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणल्या जात असल्याचे समोर येत आहे. याविषयी धनंजय देशमुख यांनीच मोठा खुलासा केला आहे.
केस मागे घेण्यासाठी दबाव?
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाची बीडमध्ये आज सुनावणी पार पडली. यानंतर मिडीयाशी बोलताना स्व.संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मोठा दावा केलाय, मला आणि माझ्या नातेवाईकांना वेगवेगळ्या नंबर वरून फोन येत आहेत हि केस कशी थांबेल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आम्ही त्यामध्ये पडत नाहीत. पोलीस अधीक्षकांना या संदर्भातील रितसर लेखी तक्रार केलेली आहे. आज पोलीस अधीक्षक असतील तर त्यांना भेटणार आहे. या संदर्भात कारवाई होईल अशी अपेक्षा देखील धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 एप्रिल रोजी
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी सात एप्रिल रोजी होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणावर आज बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीत आरोपींच्या वकिलांना लॅपटॉप मधील अतिरिक्त पुरावे, पेन ड्राइव्ह मधून देण्यात आले. तर आरोपीच्या वकिलांनी पंचनाम्याचे व्हिडिओ मिळावे अशी मागणी न्यायालयाकडे केली परंतु सदरील व्हिडिओ ई – साक्ष या शासकीय ॲप वर अपलोड असल्याने देऊ शकत नसल्याचे सरकारी पक्षाने म्हणणे मांडले.
तर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करावी असा अर्ज आरोपी क्रमांक 3 ते 7 कडून करण्यात आला होता. तो अर्ज आज न्यायालयाने ना मंजूर केला. या बरोबरच वाल्मीक कराड कडून आणखी एका वकिलाची नियुक्ती करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील ॲड. निलेश घाणेकर हे आता कराडची बाजू मांडणार आहेत.