
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातन सतत धक्कादायक प्रकार घडत असतात. काही दिवसांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमध्ये खळबळ माजली होती. या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड हा सध्या तुरुंगात आहे. त्यापोठापाठ आता बीड शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे राहणाऱ्या एका महिलेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने गेली 16 वर्षे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तसेच या महिलेवर मुलाला नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून अत्याचार करण्यात आले. या महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी नारायण शिंदेने एका महिलेची फसवणूक केली आहे. 2006 ते 2022 या दरम्यान तुझ्या मुलाला नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून नारायण शिंदे याने सलग 16 वर्षे महिलेवर अत्याचार केले. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली आहे. नारायण शिंदे हा नेकनूर येथील माजी जिल्हा परिषद सदस्य आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आणि अत्यंत जवळीक असलेला कार्यकर्ता आहे. दरम्यान या फिर्यादीमध्ये पिडीतेने आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत.
वाचा: हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट म्हणजे नेमकं काय? सरकार आणि जरांगेंमध्ये त्यावरुन झालेला वाद काय?
महिलेने पोलिसात केली तक्रार
आरोपी नारायण शिंदे याने या महिलेकडून एक कोटी दहा लाख रुपये घेऊन पुण्यात फ्लॅट घेऊन देतो असे म्हणत फसवणूक केल्याचाही उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. तसेच याबाबत पोलीसात तक्रार केल्यानंतर तुला मारून टाकीन, माझी वरपर्यंत पोहोच आहे अशी धमकी देण्यात आल्याचे देखील महिलेने तक्रारीमध्ये म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे.