‘मग खरा जातीवाद कोण करतं?’ महंत नामदेवशास्त्रींच्या ‘त्या’ विधानानंतर भागचंद महाराज संतापले!

प्रसिद्ध कीर्तनकार भागचंद महाराज झांजे यांनी भगवानगडाचे महंत महंत नामदेवशास्त्री यांच्यावर टीका केली आहे.

मग खरा जातीवाद कोण करतं? महंत नामदेवशास्त्रींच्या त्या विधानानंतर भागचंद महाराज संतापले!
bhagchand maharaj zanje mahant namdev shastri
| Updated on: Apr 17, 2025 | 8:45 PM

Namdev Shastri And Bhagchand Maharaj : प्रसिद्ध कीर्तनकार भागचंद महाराज झांजे यांनी भगवानगडाचे महंत महंत नामदेवशास्त्री यांच्यावर टीका केली आहे. भगवान बाबा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही. मात्र जीवन उद्ध्वस्त होतं. तुम्ही मराठा समाजाचे 50 मुले सांभाळून समाजावर उपकार करता का? अशा शब्दांत त्य भागचंद महाराज यांनी नामदेवशास्त्रींवर टीका केलीय.

भगवानबाबांची काठी कुणालाही लागलेली नाही- भागचंद महाराज

“आज नारळी सप्ताहानिमित्त नामदेव महाराज शास्त्री यांनी एक वक्तव्य केलं. संत भगवानबाबांची काठी लागली तर कुणाला कळत नाही, असं ते म्हणालेत. मात्र भगवानबाबांच्या चरित्रामध्ये त्यांची काठी कुणालाही लागल्याचा उल्लेख नाही. आजही भाविक-भक्त संत भगवानबाबांना मानतात. कारण त्यांच्याच कृपेमुळे असंख्य भक्तांचं कल्याण झालं आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने संत भगवानबाबांसाठी महाराष्ट्रातील, देशातील, परदेशातील भाविक येतात. भगवानबाबांची काठी कुणालाही लागलेली नाही. तसा कुठेही उल्लेख नाही,” अशी घणाघाती टीका भागचंद महाराज यांनी केली.

मग खरा जातीवाद कोण करतो?

तसेच “आम्ही 200 मुले सांभाळतो. त्यातील 50 मुले ही मराठा समाजाची आहेत. कधी आळंदीला जा. तिथे कितीतरी मुलं रोज वारकरी संप्रदायामध्ये घडतात. तिथे कधीच जात विचारली जात नाही. संत भगवानबाबांनीही कधीच कुणाच्या जातीचा उल्लेख केलेला नाही. त्यांनी कधी कुणाचा धर्म विचारला नाही. आज तुम्ही 50 मुलं सांभाळून जात काढता. वरून म्हणता की जातीवाद करू नका. मग खरा जातीवाद कोण करतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
“जर तुम्ही जातीचा उल्लेख करून एवढी मुलं सांभाळतो असे सांगता. मग तुम्ही एखाद्या समाजावर उपकार करता का. संत भगवानबाबा यांचे फक्त एकाच समाजातील भक्त आहेत का? तुम्ही एवढ्या उंचीवरच्या व्यक्ती आहात. तुमच्या तोंडून हे वाक्य शोभत नाही,” असाही हल्लाबोल भागचंद झांजे महाराजांनी केला.

नामदेवशास्त्री काय म्हणाले होते?

संत भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताहाची सांगता बीडच्या शिरूर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे पार पडली. यावेळी भगवानबाबा गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची वाणी बंद पडलेली आहे. त्यांच्यासाठी सर्वांनी प्रार्थना करा, असे आवाहन केले. तसेच पुढे बोलताना भगवानबाबा जेव्हा मारतात तेव्हा त्यांच्या काठीचा आवाज येत नाही. भगवानगडाशी छेडछाड करु नका, असेही नामदेवशास्त्रींनी म्हटलंय. भगवानबाबांच्या काठीचा उल्लेख करून महंत नामदेवशास्त्रींनी केलेल्या याच विधानाचा समाचार भागचंद महाराजांनी घेतलाय.