भाई जगताप मला धर्मावरून बोलले, आमदार झिशान सिद्दीकी यांची सोनियांकडे तक्रार; निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये जुंपली

झिशान सिद्दीकी यांना आमदार असल्याने राजगृहात जायचे होते. मात्र, त्याला भाई जगताप यांनी विरोध दर्शवला. यावरून दोघांमध्ये खटके उडाले. हे सारे चित्र कॅमेऱ्यातही कैद झाले.

भाई जगताप मला धर्मावरून बोलले, आमदार झिशान सिद्दीकी यांची सोनियांकडे तक्रार; निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये जुंपली
भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी.
| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 6:03 PM

मुंबईः ऐन मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह विकोपाला गेला असून, याचे दर्शन गेल्या चार दिवसांपासून टीव्हीवर होत आहेच. आता याच वादाने पुढचे पाऊल टाकले असून, वांद्रे पश्चिमचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरोधात थेट सोनिया गांधी यांना पत्र लिहून तक्रार केल्याचे समजते. त्यात भाई जगताप हे आपल्याला धर्मावरून बोलले, असा गंभीर आरोप करत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

असा झाला वाद

मुंबईतली ही घटना आहे. त्यावरून भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यामध्ये ठिणगी पडली. त्याचे झाले असे की, 14 नोव्हेंबर रोजी काँग्रेसची रॅली निघालेली. त्यात रॅलीत जगताप आणि सिद्दीकी यांच्यामध्ये बाचाबाची झाली. राजगृहात प्रवेश करण्यावरून हा वाद झाला. सिद्दीकी यांना आमदार असल्याने राजगृहात जायचे होते. मात्र, त्याला जगताप यांनी विरोध दर्शवला. यावरून दोघांमध्ये खटके उडाले. हे सारे चित्र कॅमेऱ्यातही कैद झाले. राजगृहात केवळ दहा जणांना प्रवेश होता. त्यामुळे इतरांना प्रवेश दिला नाही, असे सांगण्यात आले. मात्र, सिद्दीकी यांना व्यासपीठावर जातानाही रोखले गेले. त्यामुळे पदयात्रा अर्धवट सोडून त्यांनी घरचा रस्ता धरला.

पत्रात ही केली तक्रार

आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून या साऱ्या प्रकाराची माहिती दिली आहे. सिद्दीकी आपल्या पत्रात म्हणतात की, मुंबईत 14 नोव्हेंबर रोजी निघालेल्या पदयात्रेमध्ये आमदार भाई जगताप यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केले. माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सिद्दीकी यांनी केला आहे. आपल्यासोबत यावेळी धक्काबुक्की करण्यात आली. शेकडो जणांसमोर माझा अपमान केला गेला. केवळ पक्षाच्या प्रतिमेपायी मी काहीच बोललो नाही. त्यामुळे या साऱ्या प्रकरणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे.

इतर बातम्याः

कोण होतास तू… काय झालास तू…अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू; फडणवीसांची राऊतांवर जळजळीत टीका!

बहुचर्चित आमदार-मंत्री वादावर तूर्तास पडदा, कांदे म्हणतात समाधान, 90 टक्के निधी आत्ताच मिळाल्याचा भुजबळांचा दावा

Pawar’s friendship: शरदाच्या दारात तारुण्याचे सदाबहार तोरण, हिरव्यागार दोस्तांचा बहारदार मळा अन् फुलांचे गाव!