
भंडारा : जंगलातून (forest) भटकलेले एक रानडुक्कर (wild boar) थेट जिल्हा परिषदेच्या शाळेत शिरण्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चुल्हाड येथे घडली. तब्बल सात तासांच्या प्रयत्नानंतर या रानडुकराला वनविभागाने जेरबंद केले. रानडुकराला पाहण्यासाठी शाळेसमोर मोठी गर्दी झाली होती. चुल्हाड येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. तीन दिवसीय स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याने त्यासाठी मंडप उभारणीचे काम सुरू होते. अचानक रानडुक्कर शाळेत शिरले. त्यावेळी शाळेत एकही विद्यार्थी नव्हता. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळं गावकरी गोळा झाले. रानडुकराला कसे बाहेर काढता येईल, यासाठी प्रयत्न करण्यात आले. शेवटी वनविभागाला फोन करून माहिती देण्यात आली.
रानडुक्कर आल्याचे माहीत होताच शाळा परिसरात गर्दी झाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाची टीम दाखल झाली. जंगलातून भटकलेले रानडुक्कर शाळेत शिरल्यानंतर वनविभागाने जेरबंद केले. मात्र रानडुक्कर जखमी असल्याचे लक्षात आले. रानडुकराला जेरबंद केल्यानंतर बपेरा येथील पशुचिकित्सालयात नेण्यात आले. तिथं त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोंड्याटोला जंगलात सोडून देण्यात आले.
या घटनेमुळं चुल्हाडवासी चांगलेच घाबरले. रानडुक्कर शेताचे नुकसान करतात. जंगलाशेजारील गावांत रानडुकरांचा मोठा त्रास होतो. त्यामुळं अवैध शिकारीची शक्यता नाकारता येत नाही. वन्यप्राणी शेतशिवाराज येऊ नये म्हणून वनविभागाचे कुंपण करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत, लाखांदूर तालुक्यातील दिघोरी येथील गावालगतच्या शेतात काही शेतकऱ्यांना बिबट्याचे पगमार्क आढळले. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. रात्रीच्यावेळी दोन बछड्यांसह मादी बिबट्याने नदीकडे धूम ठोकताना बिबट्या बघितल्याचा दावा करण्यात आला. आता या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.