भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले अन् माघारी फिरले, काय घडलं?

| Updated on: Mar 21, 2023 | 4:41 PM

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज भास्कर जाधव यांची नाराजी चर्चेचा विषय ठरली. विधानभवनात प्रवेश न करताच भास्कर जाधव माघारी फिरले.

भास्कर जाधव विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक झाले अन् माघारी फिरले, काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) आजचा दिवस विविध घटना घडामोडींनी भरलेला होता. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेले आरोप यांच्यापासून ते आदित्य ठाकरे यांचं लग्न यावर देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलेल्या मिश्किल टिप्पणीपर्यंत.. यातच विधानभवन परिसरातील आणखी एक घटना जास्त चर्चेत आहे. कोकणातले ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव आज सकाळी नेहमीच्या वेळेला विधानभवनात आले, मात्र विधान भवनात गेले नाहीत. विधान भवनाच्या पायऱ्यांवर ते नतमस्तक झाले आणि माघारी फिरले.भास्कर जाधव नेमके कोणत्या कारणामुळे नाराज आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या. त्यानंतर आपण आज सभागृहात का जाणार नाहीत, याचं कारणही त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं…

कारण काय सांगितलं?

भास्कर जाधव यांनी त्यांच्या नाराजीचं कारण स्पष्ट सांगितलं. ते म्हणाले, ‘ आज मी सभागृहातून बाहेर पडलोय. पुढचे ३ दिवस सभागृह सुरू राहणार आहे. पण उद्या गुढी पाडव्याला आम्ही घरी निघालोय. पुढचे ३ दिवस मी सभागृहात येणारच नाही. येण्याची इच्छा नाहीये. मनात वेदना आहेत. भास्कर जाधव एकही दिवस चुकवत नाही. पण यावेळेला मला जाणीवपूर्वक बोलू दिलं जात नाहीये. विषय मांडू दिले जात नाहीयेत. मी नियमानं बोलण्याचा प्रयत्न करतोय. हे अधिवेशन, कामकाज चालावं यासाठी मी नियमात राहून लक्षवेधी मांडण्याचा प्रयत्न केला, मात्र ती लावली जात नाहीये. त्यामुळे पुढील तीन दिवस मी सभागृहात येणार नाही, अशी भूमिका भास्कर जाधव यांनी घेतली.

एकही लक्षवेधी घेतली नाही…

विदर्भ, मराठवाड्यात शेतकरी खूप संकटात आहे, निसर्ग कोपाने त्यांचे अतोनात नुकसान होत आहे. सभागृहात मी पुन्हा आता येणार नाही. मला जाणीवपूर्वक सभागृहात बोलू दिले जात नाही. हे सभागृह घटनेने चालावे हे अपेक्षा असते. माझी एकही लक्षवेधी लागलेली नाही. अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली. कोकणात खूप पाऊस पडतो व रस्ते खराब होतात. पण 1992-93 मध्ये एनरॉन कंपनीने रस्ते बांधले ते अजून जशास तसे आहेत. मग तसे रस्ते आज का बांधले जात नाहीत, असा सवाल भास्कर जाधव यांनी केलाय.

महाराष्ट्र खिळखिळा होतोय..

मुंबईतील टेक्सटाइल कमिशनर ऑफिस दिल्लीला हलवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने नुकतीच यासाठी परवानगी दिली आहे. यावरून भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘टेक्सटाइलचे कमिशनर ऑफिस दिल्लीत जात आहे. मुंबई ही गिरणी कामगारांची आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापूस होत आहे. याला उभारी द्यायची गरज होती. 2014 नंतर महाराष्ट्रातील अनेक उद्योग, महत्वाची कार्यालये गुजरातेत गेली. टेक्सटाइल ऑफिस हे जर दिल्लीला नेले जात असेल तर महाराष्ट्र कसा खिळखिळा होत आहे हे आता जनतेने पहावे.