
पुणे जिल्ह्यातल्या भिगवणमध्ये एका तरुणीचे अपहरण केल्याचा दावा केला जात होता, विशेष म्हणजे या मुलीचं लग्न दोन दिवसांवर असताना तिचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. लग्नाची खरेदी करुन ही तरुणी आपल्या आई आणि भावासोबत घरी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं, यावेळी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यात मिरची पूड देखील टाकण्यात आली असा दावा करण्यात येत होता. मात्र त्यानंतर या प्रकरणात मोठं ट्विस्ट आल्याचं पहायला मिळत आहे. या मुलीचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्या व्हिडीओमध्ये बोलताना या मुलीनं मोठा दावा केला होता. मी सबंधित मुलासोबत माझ्या मर्जीने पळून आले, आमचे प्रेमसंबंध आहेत, असं या मुलीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर ते दोघेही पोलिसांसमोर हजर झाले. दरम्यान त्यानंतर आता या प्रकरणावर बोलताना पु्ण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाले गिल?
भिगवण प्रकरणात संबंधित मुलीने पोलिसांकडे येण्यापूर्वी एक व्हिडीओ चित्रित केला होता, या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपलं मत मांडलं होतं. आणि आता जेव्हा ते पोलीस ठाण्यात आले, तेव्हा देखील त्या मुलीचं तेच मत आहे, ती स्वत:हून गेली होती. पण या प्रकरणात मुलीच्या घरच्यांचं म्हणणं वेगळं आहे. त्यामुळे आता आम्ही दोन्ही बाजूंचा बारकाईने तपास करत आहोत. आम्ही त्या तरुणीला आज जबाबासाठी कोर्टासमोर हजर केलं होतं. तीने आपला जबाब नोंदवला आहे, पुढील तपास सुरू आहे. इतरही काही शक्यता आहेत का? याची देखील आम्ही तपासणी करत आहोत, अशी माहिती गिल यांनी दिली आहे.
दरम्यान यावेळी पोलीस अधीक्षकांना असा प्रश्न देखील विचारण्यात आला की, मुलीच्या भावाने तक्रार केली की त्यांच्या डोळ्यात तिखड टाकण्यात आलं आणि नंतर अपहरण करण्यात आलं? अशी घटना खरच घडली होती का? यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी तेच म्हणतोय दोन्हीचे जबाब वेगवेगळे आहेत. मुलीचा भाऊ आणि आई वेगळं सांगत आहे, तर तरुणीने आपली बाजू मांडताना वेगळं सांगितलं आहे. आम्ही दोन्ही बाजूंचं म्हणणं नोंदवलं आहे. मात्र या प्रकरणात फिर्यादीने जी तक्रार दिली आहे, त्याचा आम्ही सखोल तपास करत आहोत. घटनास्थळी नेमकं काय घडलं होतं? त्या वस्तुस्थितीचा आमच्या पथकांकडून बारकाईने तपास सुरू आहे. यामध्ये जे काही समोर येईल, त्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई करू, सध्या मुलीने तिच्या आई बाबाकडे जाण्यास नकार दिला आहे, त्यामुळे त्यांचं पुढील मत काय आहे? हे त्यांना विचारण्यात येईल, महिला घरासारखे देखील काही पर्याय आहेत, याचाही विचार सुरू आहे. या प्रकरणात ऑलरेडी एफआयआर दाखल झाली आहे, असं माहिती त्यांनी दिली.
दरम्यान आम्ही गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात तपास करत आहोत. पहिल्या दोन दिवसांमध्ये आमच्यासमोर काही तांत्रिक पुरावे आले आहेत, तसेच काही इतरही पुरावे आहेत, ते सर्व आम्ही गोळा केलेले आहेत. मात्र सध्या तरी या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही, असंही यावेळी गिल यांनी म्हटलं आहे.