भिवंडी: गोदामाला लागलेली आग आटोक्यात, लाखोंचा माल जळून खाक

भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट गोदाम संकुलातील कुरिअर तसेच केमिकल साठवलेल्या गोदामास लागलेल्या भीषण आग लागली होती. या आगीवर दहा तासानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे.

भिवंडी: गोदामाला लागलेली आग आटोक्यात, लाखोंचा माल जळून खाक
Bhiwandi Fire
| Updated on: Oct 06, 2025 | 5:36 PM

रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील लोनाड ग्रामपंचायत हद्दीतील पॅरामाउंट गोदाम संकुलातील कुरिअर तसेच केमिकल साठवलेल्या गोदामास लागलेल्या भीषण आग लागली होती. या आगीवर दहा तासानंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आले आहे. रात्रभर भिवंडी सह कल्याण डोंबिवली उल्हासनगर पालिका तसेच जिंदाल स्टील कंपनीच्या एकूण पाच गाड्यांनी दहा तासानंतर या आगीवर नियंत्रण मिळवले आहे.

या भीषण आगीमध्ये गोदामाचे संपूर्ण छत कोसळले असून गोदामात साठवलेला लाखो रुपये किमतीचा माल जळून खाक झाला आहे. ग्रामीण गोदाम पट्ट्यात पाणी उपलब्ध न झाल्यामुळे आग विझवण्यास उशीर झाला. सध्या या आगीच्या ठिकाणी फक्त धूर दिसून येत आहे. खबरदारी म्हणून भिवंडी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तैनात आहेत.

जवळील गोदामांना वाचवण्यात यश

अग्निशमन दलाचे कर्मचारी वजीर पटेल यांनी या आगीबाबत बोलवताना म्हटले की, ‘रविवारी रात्री 9:45 वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. आम्ही पथकासह घटनास्थळी पोहोचल्यानंतर संपूर्ण गोदाम आगीच्या विळख्यात असलेले दिसले. या आगीची तीव्रता लक्षात घेता, कल्याण आणि उल्हासनगर येथून अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्या बोलावण्यात आल्या. बराच प्रयत्न केल्यानंतर जवळील गोदामे आगापासून वाचवण्यात आली. या गोदामात काही रसायने आणि कपडे होते, त्यामुळे आग भडकली होती.’ दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

मोठे नुकसान

शॅडो फॅक्स कुरिअर कंपनीच्या गोदामाला लागलेल्या या आगीत गोदामात असलेला ऑनलाइन उत्पादनांचा मोठा साठा जळून खाक झाला. या घटनेत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. आग लागली त्यावेळी गोदाम बंद होते, त्यामुळे या घटनेत कोणतीही जीवितहाणी झालेली नाही. मात्र या आगामुळे लाखोंचा माल जळून खाक झाला आहे.