
स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणारा, स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातवर (Ashok Kharat) लैंगिक शोषणाचा, अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या क्राईम ब्रांच युनिट 1 मध्ये गेल्या तीन दिवसांपासून त्याची अथक चौकशी सुरू असून एकेक नवनवे कारनामे, काळी कृत्य उघडकीस येत आहेत. दरम्यान या भोंदूबाबा प्रकरणात आता एक नवी, मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी शिवनिका संस्थानच्या ट्रस्टींचीही चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ट्रस्टने नेमके काय व्यवहार केले, जमिनींची खरेदी केली आहे का, पैशांचे व्यवहार केलेत का याची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठी, नवी माहिती समोर येऊ शकते.
शिवनिका या संस्थानाचे अध्यक्षपद हे लैंगिक शोषणाचा आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे होतं. काही वर्षांपूर्वी जुन्या ट्रस्टींनी साथ सोडल्यानंतर नव्या विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली होती. अशोक खरात याने त्याची पत्नी तेच निकटवर्तीयांना या संस्थानाच्या अध्यक्षपदी बसवलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यादेखील शिवनिका संस्थानवर ट्रस्टी होत्या. – विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट 2025 मध्येच संपल्याचा खुलासा रुपाली चाकणकर यांनी केला होता. अशोक खरात याला अटक झाल्यानंतर विश्वस्त मंडळाचा फलकही आता तिथून गायब झाला आहे. खरात प्रकरणाची कसून चौकशी सुरू असून संबंधित ट्रस्टींना SIT कडून बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. त
तसेच या मंदिर संस्थानमधील कारभार आणि संपूर्ण ट्रस्टचा आर्थिक व्यवहारही तपासाच्या रडारवर असून त्यांचीही तपासणी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कुठे काही गैरव्यवहार झालेत का याचाही तपास केला जाणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ट्रस्टी होते, त्यांना भोंदूबाबा अशोक खरातच्या या संपूर्ण कारनाम्यांची माहिती होती का , त्याच्याकडे काय माहिती आहे , त्यांच्यापैकी कोणी पीडित होतं का हे सगळं तपासलं जाणार आहे.
कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय बंद
दरम्यान नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरात कार्यालय भोंदू अशोक खरातचं जे कार्यालय होतं, ते गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती परिसरातल्या लोकांनी दिली. याच कार्यालयात भोंदू बाबा अशोक खरात भक्तांना बोलवायचा. इथेच जमिनींचे कोट्यावधींचे डील चालायचे. कार्यालयाबाहेर प्रॉपर्टी डीलर्स आणि डेव्हलपर्स अशी पाटी आहे, हेच कार्यालय आता बंद आहे.