भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना…

Manohar Bhosale : रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशातच आता भोसलेचे नवी मुंबई कनेक्शनही समोर आले आहे.

भोंदू मनोहर भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन, पंचतारांकित हॉटेलमध्ये नको तो प्रकार, VIP लोकांना...
Bhondu Bhosale
Image Credit source: Google
| Updated on: Apr 25, 2026 | 5:03 PM

सोलापूरातून आता नवा भोंदूबाबा समोर आला आहे. सोलापूरातील रिअल इस्टेट एजंट गौतम कसबे याच्याकडून विधीवत पूजेसाठी भोंदू मनोहर भोसले याने 50 हजार रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भोंदू मनोहर भोसले सह त्याचा साथीदार विशाल वाघमारेला कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला माढा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मनोहर भोसले याला 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आता मनोहर भोसलेचे नवनवीन कांड समोर यायला लागले आहेत. तसेच त्याचे नवी मुंबई कनेक्शनही समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले सरकारी वकील?

आज मनोहर भोसलेला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. याबाबत बोलताना जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी म्हटले की, भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या मनोहर भोसलेची इतर कुठल्या जिल्ह्यात संपत्ती आहे का? पूर्वीच्या बलात्काराच्या गुन्ह्यांनुसार कुठल्या महिलांवर त्याच्याकडून अत्याचार झाले आहेत का ? अशा गोष्टीच्या तपासासाठी आणि सध्याच्या पन्नास हजार रक्कम वसूल करण्यासाठी सरकारी पक्षाकडून पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती मात्र आता न्यायालयाने त्याला 3 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

भोंदू भोसलेच्या वकिलाने दिली महत्त्वाची माहिती

मनोहर भोसलेचे वकील सुभाष हल्याळकर यांनी सांगितले की, महाराजांचा या प्रकरणांशी संबंध नाही. महाराजांच्या हातात पैसे दिलेल नाहीत, कोणाच्या हातात पैसे दिले याची माहिती नाही. 24 तासात कोर्टात हजर करणे गरजेचे होते. शिवाय अटक ज्या पद्धतीने केली ती प्रक्रिया चुकीची होती. जो पर्यंत गुन्हे सिद्ध होत नाही तो पर्यंत सराईत गुन्हेगार म्हणता येऊ शकतं नाही. जादूटोणा कायद्याचा तपास करण्याचा अधिकार पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्याला नाही. हे सर्व मुद्दे आम्ही कोर्टासमोर मांडलेले आहेत. कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावणी दिली आहे.

भोंदू भोसलेचे नवी मुंबई कनेक्शन

नवी मुंबईत भोंदू बाबा मनोहर मामा भोसले याचं धक्कादायक कनेक्शन समोर आलं आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये दरबार भरवत, व्हीआयपींना आकर्षित करून तब्बल 51 हजार रुपयांची फी आकारली जात असल्याची माहिती समोर आली आहे. भविष्य सांगणे, अडचणी दूर करणे आणि वाईट शक्तींपासून संरक्षण देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची उकळपट्टी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे, या दरबारासाठी काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासंदर्भातील काही फोटो TV9 मराठीच्या हाती लागले असून या प्रकरणाचा तपास आता वेगाने सुरू आहे.

भोंदू भोसलेचा घोटी येथे आश्रम

बुवाबाजी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आलिशान आश्रम करमाळा तालुक्यातील घोटी या ठिकाणी आहे .दर अमावस्येला याच ठिकाणी बडी मंडळी आणि राजकीय नेत्यांची गर्दी असायची. कोणाला घरच्या समस्या तर कोणाला आर्थिक समस्या कोणाला आपली भविष्य जाणून घ्यायचे असायचे अशी सर्व बडीमंडळी या मामाच्या चरणी दाखल झालेली असायचे.

दर अमावस्येला शंभर ते दीडशे आलिशान गाड्या या माळरानावरील आलिशान आश्रमात येत असत. यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते आमदार खासदार बडे उद्योजक शिक्षण सम्राट अशा अनेकांना मनोहरमामाने वेड लावले होते. 27 एकरावर पसरलेल्या या आलिशान आश्रमात गेल्या पाच वर्षापासून नवनवीन डेव्हलपमेंट सुरू असून आश्रमाच्या समोरच आंब्याची मोठी बाग आहे. आमच्या आश्रमाच्या सभा मंडपासाठी थेट राजस्थान आणि कोकणातून लाल दगड आणल्याचे सांगितले जात आहे . या जागेत भक्तांच्या प्रतीक्षेसाठी मोठे हॉल असून आत मामांची आलिशान केबिन आहे. संपूर्ण आश्रमाला कंपाउंड करण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.

सध्या मनोहर मामाच्या या आश्रमात कालपासून पोलीस बंदोबस्त तैणात ठेवण्यात आला आहे. सध्या पोलीस बाहेरच्या कोणालाही आश्रमात सोडत नसून आश्रमातूनही कोणाला बाहेर जाऊ दिले जात नाही. त्यामुळे सध्या आश्रमात मनोहर मामांचा सेवकवर्ग असून बाहेरचा कोणीही सध्या आश्रमात जाऊ शकत नाही. सोलापूर पोलिसांनी भोंदूगिरी चा विरोधात कारवाईला सुरुवात केली असून सध्या मनोहर भोसले हा पोलिसांच्या रडारवर आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us