देशातील 4 राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा कहर, उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिक सावध, घेतली जातीय अशी काळजी

देशातल्या 4 राज्यांत 'बर्ड फ्लू' ने धडक दिल्यानंतर उस्मानाबादचे पोल्ट्री व्यावसायिक अलर्ट झाले आहेत.

देशातील 4 राज्यांत बर्ड फ्लूचा कहर, उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिक सावध, घेतली जातीय अशी काळजी
| Updated on: Jan 06, 2021 | 3:35 PM

उस्मानाबाद : देशात कोरोना व्हायरसचा धोका अजून संपलेला नसून कोरोनाची टांगती तलवार अद्यापही लोकांच्या मानगुटीवर आहे. अशातच देशातील चार राज्यांत बर्ड फ्लू ने धुमाकूळ घातलाय. चार राज्यांतील बर्ड फ्लूच्या कहरानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील पोल्ट्रीचालकांनी वेळीच उपाययोजना करायला तसंच काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. (Bird Flu In 4 State of Country osmanabad poltry Bussinessman Alert)

बर्ड फ्लू व इतर आजार कोंबड्यांच्या पिल्लांना होऊ नये यासाठी 7 व्या , 14 व 21 व्या दिवशी लस दिली जात आहे. तसेच स्वच्छ परिसर व पाणी दिले जात असल्याची माहिती रॉयल पोल्ट्री ट्रेंड़ीगचे मालक संतोष कोकाटे यांनी दिली. जिवंत कोंबडीचे दर प्रति किलो 98 रुपये होते ते आता 93 रुपये झाले असून पिल्लांचे दरही 8 रुपये कमी झाले आहेत. बाजारात बॉयलर चिकन 180 रुपये किलोने विकले जात असून विक्रीवर व किंमतीवर परीणाम झालेला नाही. कोरोना काळात कोंबडया विक्रीवर चांगलाच परिणाम झाला होता त्यानंतर आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले असल्याने पोल्ट्री चालक धास्तावले आहेत.

“ऐन कोरोनाच्या संसर्गाच्या काळात कोंबडी म्हणूनचं सेवन केलं म्हणून कोरोना होतो किंवा त्याचा संसर्ग अधिक होतो, अशा बातम्या पसरल्या होत्या. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं होतं. मात्र सुदैवाने सध्या तरी बर्ड फ्लू चा कोंबडी विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही”, असंही उस्मानाबादेतील पोल्ट्री व्यावसायिकांनी सांगितलं.

मध्यप्रदेशात सध्या बर्ड फ्लूने थैमान घातलं आहे. तिथे आतापर्यंत 7 ते 8 जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव वाढत आहे. बर्ड फ्लू मुळे 400 हून अधिक कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर झाबुआ जिल्ह्यातील प्रसिद्ध कडकनाथ कोंबड्यांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे.

बर्ड फ्लू म्हणजे काय?

बर्ड फ्लू एवियन इन्फ्लूएंजा वायरस (H5N1) मुळे होतो. बर्ड फ्लू एकप्रकारे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा आजार फक्त पक्ष्यांनाच नाही तर जनावरं आणि माणसांनाही होऊ शकतो. संसर्ग झालेल्या पक्ष्याच्या संपर्कात आल्यास बर्ड फ्लू होऊ शकतो. योग्यवेळी आणि योग्य उपचार न मिळाल्यास माणूस दगावण्याचीही भीती असते.

केंद्र सरकारकडून नियमावली जारी

बर्ड फ्लूच्या फैलावाची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारकडून दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना विटॅमिन्सचा डोस जिला जात आहे. कडकनाथ कोंबड्यांमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये यासाठी महत्वाची पाऊलं उचलली जात आहेत. बाहेरिल लोकांना हॅचरीमध्ये जाण्यापासून प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसंच कोंबड्यांना होणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पारंपरिक उपाययोजनाही राबवल्या जात आहेत.

मध्यप्रदेशातील खरगोन, इंदोर, मंदसोर, आगर, खरगोन, उज्जैन, देवास, नीमच आणि सीहोर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू होत आहे. कावळे मृतावस्थेत सापडत असल्यानं पशुपालन विभागही अलर्टवर आहे. जिथे कावळे मृतावस्थेत सापडत आहेत, त्या परिसरातील कावळ्यांची चाचणी करण्यात येत आहे. तसंच परिसरातील पोल्ट्री फार्ममध्येही तपासणी सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

हे ही वाचा :

आता बर्ड फ्लूचं संकट!, कोहलीसह धोनीच्या आवडत्या ‘कडकनाथ’ला वाचवण्यासाठी खास प्रयत्न

Birds Dying in India :कोरोनानंतर बर्ड फ्लूचं संकट?, देशभरात हजारो पक्षांचा मृत्यू, राजस्थानात हायअलर्ट

Bird Flu | आधी कोरोना त्यातच पुन्हा ‘बर्ड फ्लू’चा शिरकाव, ‘ही’ लक्षणे दिसताच घ्या वैद्यकीय मदत!