राजेश टोपेंनी स्वतःच्या निधीतून मर्दुमकी गाजवावी, इतरांची काम हलवण्याच्या भानगडीत पडू नये : सहदेव मोरे

| Updated on: Feb 13, 2021 | 2:23 AM

जिल्ह्यातील नेर तालुका येथील 132 केव्हीचं काम सत्तेचा गैरवापर करून हलवण्याचा घाट पालकमंत्री राजेश टोपे करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सहदेव मोरे यांनी केलाय.

राजेश टोपेंनी स्वतःच्या निधीतून मर्दुमकी गाजवावी, इतरांची काम हलवण्याच्या भानगडीत पडू नये : सहदेव मोरे
Follow us on

जालना : जिल्ह्यातील नेर तालुका येथील 132 केव्हीचं काम सत्तेचा गैरवापर करून हलवण्याचा घाट पालकमंत्री राजेश टोपे करत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते सहदेव मोरे यांनी केलाय. हे पालकमंत्र्यांचं लबाड धोरण असल्याचा आरोप करत मोरे यांनी याविरोधात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत नेर येथे 13 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक उपोषण करणार असल्याची माहिती दिलीय (BJP leader Sahdeo More criticize Rajesh Tope over 132 KV work in Jalna).

सहदेव मोरे म्हणाले, “माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी संपूर्ण जालना जिल्ह्यात विजेचे जाळं निर्माण व्हावा यासाठी जालना व परतूर येथे 220 केव्ही, नेर येथे 132 के व्ही यासह जिल्हाभरात 49-33 केव्हीचं काम मंजूर केलं होतं. त्यातील जवळपास सर्वच ते 30 केवी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न बऱ्यापैकी संपवण्याचे काम लोणीकर यांनी केलंय. मात्र, त्यातील एक 132 केव्हीचं काम राजेश टोपे हलवण्याचा घाट घालत आहेत.”

‘टोपेंनी लोणीकर यांनी मंजूर करून आणलेल्या कामावर मर्दुमकी गाजवू नये’

“पालकमंत्री राजेश टोपे यांनी स्वतःचा निधी मंजूर करून आणावा आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणी विजेचे जाळं निर्माण करावं. त्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. प्रसंगी शेतकऱ्यांच्या हितासाठी या मुद्द्यावर आम्ही पालकमंत्र्यांच्या सोबत आहोत. परंतु माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंजूर करून आणलेल्या कामावर मर्दुमकी गाजवू नये,” असं मत सहदेव मोरे यांनी व्यक्त केलंय.

‘राजेश टोपे यांच्या सत्तेतील 16 वर्षांच्या काळात जालन्यात केवळ 5 – 33 केव्ही मंजूर’

मोरे म्हणाले, “पालकमंत्री राजेश टोपे यांच्या सत्तेतील 16 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 5 – 33 केव्ही मंजूर केले होते, तर त्या तुलनेत माजी पालकमंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मात्र 2- 220 केव्ही, 1- 132 के व्ही, तर तब्बल 49 – 33 केव्ही मंजूर केले आहेत. असं असताना पालकमंत्री टोपे यांनी नवीन मंजुरी न आणता नियर व परिसरातील 100 गावांच्या विजेचा प्रश्न सुटू शकतो. असा प्रकल्प हलवण्याचा घाट घालू नये. या गावांमध्ये पालकमंत्री राजेश टोपे यांच्या मतदार संघातील गावांचा देखील समावेश आहे.”

‘… तर प्रसंगी आत्मदहन करावे लागेल’

“माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर पालकमंत्री असताना त्यांनी कधीही दुजाभाव केला नाही. अगदी असाच मनाचा मोठेपणा विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे यांनी दाखवावा. या पलीकडे हा प्रकल्प हलवण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातलाच तर प्रसंगी मंत्र्यांच्या घरासमोर आमरण उपोषण किंवा प्रसंगी आत्मदहन करावे लागेल,” असा इशारा संजय गांधी निराधार समितीचे जालना तालुकाध्यक्ष सहदेव मोरे यांनी दिला.

‘टोपेंनी मंजूर केलेल्या आणि उद्घाटन केलेल्या प्रकल्पाच्या कामाची अद्याप एकही वीट नाही’

सहदेव मोरे म्हणाले, “विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे मागील काळात ऊर्जामंत्री असताना उटवद (ता. जालना) येथे 33 केव्ही मंजूर केले होते. त्याचे उद्घाटन देखील केले होते. त्याचे काय झाले? याचे उत्तर अगोदर पालकमंत्री टोपे यांनी द्यावे. स्वतः मंजूर केलेल्या आणि उद्घाटन केलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी अद्यापपर्यंत एकही वीट लावू न शकलेले पालकमंत्री राजेश टोपे नेर येथील 132 केव्ही हलवण्याचा घाट घालत आहेत. पालकमंत्री राजेश टोपे यांनी आपली धमक दाखवून, आपली ताकद दाखवून अधिकाधिक मोठं विजेचं जाळं निर्माण करावं.”

“टोपेंनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मंजूर केलेल्या 132 केव्ही हलवण्याचा घाट घालू नये. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असंही सहदेव मोरे यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

कुणालाही पाठीशी घालणार नाही, दोषींवर कारवाई होणारच, राजेश टोपे आक्रमक

राज्यात 5 लाखांहून अधिक व्यक्तींना कोरोना लस, तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 1 मार्चपासून नोंदणीची शक्यता : राजेश टोपे

मुंबईसह राज्यात महिलांसाठी आता फिरता दवाखाना; राजेश टोपे यांची मोठी घोषणा

व्हिडीओ पाहा :

BJP leader Sahdeo More criticize Rajesh Tope over 132 KV work in Jalna