BJP On Mlc Election Result 2026 : ‘शिंदे शिवसेनेने एका जागेच्या हव्यासापोटी..’ तीन जागा हरल्यानंतर भाजपने जे मनात आहे ते स्पष्टपण बोलून दाखवलं
BJP On Mlc Election Result 2026 : विधान परिषदेच्या पाचा जागाचा काल निकाल जाहीर झाला आहे. सत्तेवर असूनही भाजपला तीन ठिकाणी पराभवाचा फटका बसला आहे. महायुतीमध्ये आता या निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

विधान परिषदेतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला आहे. अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यामुळे निवडणूक निकालानंतर आता त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. महायुतीमधला विसंवाद पहिल्यांदाचा अशा जाहीरपणे समोर आलेला आहे. पाच पैकी तीन जागा महायुतीने गमावल्या आहेत. यात दोन ठिकाणी भाजपला आणि एका ठिकाण अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसला. भाजपने या पराभवासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबाबदार ठरवलं आहे. त्यांच्यावर पराभवाचं खापर फोडलं आहे. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्सवर केलेली पोस्ट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
या निमित्ताने भाजपच्या मनातली खदखद, अस्वस्थता बाहेर आली आहे. शिक्षकच्या दोन आणि पदवीधरच्या तीन जागा होत्या. महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना होता. यात महाविकास आघाडीचे उमेदवार तीन ठिकाणी यशस्वी ठरले आहेत. राज्यात सत्ता असून महायुतीच्या पदरात फक्त दोन जागा आल्या. पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर या तिन्ही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन आणि काँग्रेसने एक जागा जिंकली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवार उभे केलेले. पण त्यांना कुठेही खातं उघडता आलेलं नाही.
महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला
शिक्षक आणि पदवीधरच्या या निवडणुकीत खरी कमाल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसने केली आहे. मराठवाडा आणि पुणे पदवीधरची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जिंकली, तर काँग्रेसने नागपूरचा बालेकिल्ला भाजपकडून हिसकावून घेतला. नागपूर हे मुख्यमंत्र्यांच शहर आहे. त्यामुळे तिथली पदवीधरची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय होती. पण काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी बाजी मारली. त्यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा पराभव केला. “शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीत पुणे आणि नागपूरमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने अपेक्षित सहकार्य केले नाही. पुण्यात ऐनवेळी सचिन सानप यांना पाठिंबा देऊन शिवसेनेने महायुतीच्या एकजुटीलाच धक्का दिला” असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.