ठाकरे बंधूंच्या युतीचे गणित जमले, पण महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरता ठरेना, त्या 70 जागांसाठी भाजपची शिंदेंसमोर नवीन अट

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने मुंबईतील राजकीय गणितं बदलली आहेत. मात्र, महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात १०० जागांवरून अद्यापही पेच कायम आहे.

ठाकरे बंधूंच्या युतीचे गणित जमले, पण महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरता ठरेना, त्या 70 जागांसाठी भाजपची शिंदेंसमोर नवीन अट
mahayuti vs mva 1
| Updated on: Dec 25, 2025 | 10:01 AM

राज्यात सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यातच मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर ताबा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये भाजप-शिवसेना जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मुंबईत १०० जागांची मागणी केली आहे. मात्र सध्या प्रत्यक्षात ७० जागांच्या प्रस्तावावर दोन्ही पक्षांमध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे. त्यातच सुरुवातीच्या चर्चेत भाजपने शिवसेनेला केवळ ५२ जागांचा प्रस्ताव दिल्याने शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संतापाची लाट होती. मात्र, वाढता दबाव आणि युती टिकवण्याची गरज पाहता भाजपने हा आकडा वाढवून ७० केला आहे.

अधिकाधिक जागा लढवण्याची तयारी

आजही दक्षिण मुंबई, वरळी, शिवडी आणि उपनगरातील काही महत्त्वाच्या प्रभागांवरून वाद सुरू आहे. शिवसेनेकडे सध्या २१ माजी नगरसेवक आले आहेत. २०१७ मध्ये शिवसेनेने ८४ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे आम्हाला किमान ९०-१०० जागा मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेकडून केली आहे. तर भाजपने २०१७ च्या निवडणुकीत ८२ जागा जिंकल्या होत्या. या कामगिरीनंतर भाजपने मिशन १५० यशस्वी करण्यासाठी अधिकाधिक जागा लढवण्याची तयारी केली आहे. भाजपच्या मते अनेक प्रभागांत राजकीय समीकरणे बदलली आहेत.

फ्रेंडली फाईट होण्याची शक्यता

काल मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पुन्हा बैठक पार पडली. या बैठकीत महापालिकेच्या जागावाटपावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत ज्या जागेवर ज्या पक्षाचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे, तिथे त्यालाच तिकीट दिले जाईल, मग ती जागा पारंपरिक कोणाचीही असो, या निकषावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तसेच ज्या ३० जागांवर तोडगा निघत नाही, तिथे फ्रेंडली फाईट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जेणेकरून मतांचे विभाजन टाळून तिसऱ्या पक्षाला फायदा होऊ नये, असे या बैठकीत ठरवण्यात आले.

भाजपच्या कोअर कमिटीने तयार केलेली नावे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत फायनल केली जातील. सध्या महायुतीसमोर सर्वात मोठे आव्हान हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीचे आहे. ठाकरे गटाने १५० आणि मनसेने ६०-७० जागा लढवण्याचे संकेत दिले आहेत. मराठी मतांचे विभाजन टाळण्यासाठी ही युती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे महायुतीला भाजप-शिंदे आता आपला जागावाटपाचा फॉर्म्युला अधिक विचारपूर्वक ठरवावा लागणार आहे.

दरम्याम आज संध्याकाळपर्यंत महायुतीमधील जागावाटपाचा अंतिम आकडा जाहीर होण्याची शक्यता आहे. जर पेच सुटला नाही तर थेट एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेतील, असे बोललं जात आहे.