
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विनापरवानगी बसवल्याच्या प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. या घटनेमुळे गावात दोन गटांत तणाव निर्माण झाला आहे. आता प्रशासनाने अखेर हा पुतळा हटवण्याचे लेखी आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भातील महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आता समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्यरात्री काही अज्ञात व्यक्तींनी चिखला काकड येथील अंगणवाडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा लोखंडी स्टँडवर विनापरवानगी बसवला होता. सार्वजनिक जागेवर अशा प्रकारे अचानक पुतळा बसवण्यात आल्याने गावात वादाची ठिणगी पडली. या वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटनाही समोर आली आहे, ज्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील बनली.
समोर आलेल्या कागदपत्रांनुसार, प्रशासनाने यावर टप्प्याटप्प्याने कारवाई केली आहे. गुरुवारी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी बीबी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन ऑफिसर यांनी तहसीलदार लोणार यांना अहवाल सादर केला. यात स्पष्ट नमूद करण्यात आले की, हा पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आला असून गावकऱ्यांनी तो स्वतःहून काढण्यास संमती दर्शवलेली नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तहसीलदारांनी स्तरावर निर्णय घेऊन तो हटवावा, असे नमूद करण्यात आले आहे.
त्यानंतर ११ फेब्रुवारी २०२६ रोजी लोणार तहसील कार्यालयाने गटविकास अधिकारी (BDO) आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदेश दिले. या आदेशात म्हटले आहे की, पुतळा बसवण्याबाबत कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली नसल्याने तो तात्काळ काढण्यात यावा. पुतळा काढताना आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरवण्याचे आश्वासनही देण्यात आले. तर २२ फेब्रुवारी २०२६ रोजी तणाव वाढत असल्याने उपविभागीय दंडाधिकारी (SDO) मेहकर यांनी चिखला गावात भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (जुने कलम १४४) लागू केले आहे.
ही परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी २२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजेपासून ते २६ फेब्रुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत गावात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणुका काढण्यास आणि सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सध्या चिखला काकड गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याबद्दल प्रशासन शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मात्र, विनापरवानगी पुतळा बसवणाऱ्या अज्ञातांचा शोध घेणे आणि शांततेत ही प्रक्रिया पार पाडणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.