केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना भेगा, बुलढाण्यात नव्या गंभीर आजाराने खळबळ!

बुलढाणा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी केसगळती आणि नख गळतीची गंभीर समस्या समोर आली होती. आता याच जिल्ह्यात लोकांच्या हाताला भेगा पडत असल्याचे समोर आले आहे.

केसगळती, नखगळतीनंतर आता हातांना भेगा, बुलढाण्यात नव्या गंभीर आजाराने खळबळ!
buldhana hand cracks
| Updated on: Jun 16, 2025 | 5:23 PM

बुलढाणा : गेल्या काही दिवसांपासून बुलढाणा हा जिल्हा अजब कारणांमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील काही भागात लोकांच्या डोक्यावरील केस झपाट्याने गळत होते. त्यानंतर नख गळतीचा अजब प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता येथील नागरिकांच्या हातांना भेगा पडण्याचा प्रकार समोर आला आहे. शेलगाव देशमुख या गावातील अनेक नागरिकांना हा त्रास जाणवत आहे.

20 रुग्णांची केली तपासणी

मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख या गावातील नागरिकांच्या हातांना भेगा पडत असल्याचे समोर आले आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहेत. ही बाब समोर येताच आरोग्य पथक शेलगाव देशमुख या गावात दाखल झाले आहे. या पथकाकडून 20 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. अनेकांवर सध्या उपचार चालू आहेत. याआधी बुलढाणा जिल्ह्यात डोक्यावरील केसगळीतीची समस्या जाणवत होती. त्यानंतर नख गळतीचा अजब प्रकार समोर आला होता.

आरोग्य विभागाने घेतली गंभीर दखल

विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य, आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा मतदारसंघ असलेल्या गावात हा प्रकार घडला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणानी लोकांना जाणवत असलेल्या या त्रासाची गंभीर दखल घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे एक पथक शेलगाव देशमुख मध्ये दाखल झाले आहे. या रुग्णांची जिल्हा साथरोग तथा सर्वेक्षण अधिकारी डॉ.प्रशांत तांगडे, वैद्यकीय अधिकारी तथा त्वचारोग तज्ज्ञ डॉ.बालाजी आद्रट यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

बऱ्याच दिवसांपासून आहे हा आजार

दरम्यान या पथकाने 20 रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी जवळपास सगळ्या रुग्णांना इसबगोल हा आजार असल्याचे दिसून आले. त्यांना हा आजार मागील 12 महिने ते 5 वर्षांपासून आहे. मागील 1-2 वर्षांपासून बुलढाणा व अकोला येथील त्वचारोग तज्ज्ञांकडून रुग्णावर उपचार सुरु असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर हा आजार संसर्गजन्य नसून ह्या आजाराचा व पाण्याचा काहीही संबंध नाही. विविध प्रकारचे प्रतिजन, हानिकारक पदार्थ संपर्कात आल्यास स्वयंप्रतिकार ( ऑटोइम्यून ) पद्धतीचा हा आजार उद्भवू शकतो, असे डॉक्टर सांगतात. दुसरीकडे सर्व रूग्णांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.