
पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरीच्या शोधात आलेल्या परराज्यातील २ महिला मजुरांवर काळाने घाला घातला. यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह अमरावती आणि मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. देऊळगाव राजा येथे मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका मालवाहू पिकअपला भरधाव एसटी बसने मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात २ महिला मजूर जागीच ठार झाल्या. तर अन्य पाच मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगाव राजा येथील कापूस जिनिंगमध्ये अमरावती जिल्ह्यासह मध्य प्रदेशातून अनेक महिला मजूर वास्तव्यास आहेत. त्या रोजीरोटीसाठी दररोज आजूबाजूच्या शेतांमध्ये कापूस वेचणीच्या कामासाठी जातात. गुरुवारी सकाळी या महिला कापूस वेचण्यासाठी पिंपळगाव येथे जाण्यासाठी एका मालवाहू पिकअप वाहनामध्ये चढत होत्या. या महिला पिकअप वाहनात चढत असतानाच जाफराबाद-जालना मार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एसटी बसने या मालवाहू पिकअपला मागून अत्यंत जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात पिकअपमध्ये चढणाऱ्या दोन महिला मजुरांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. मायाबाई सुरज काजले (३२) आणि रिचाय काल्या कासदेकर (७२) या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सुहाना प्रतिराम इपने, खुशबू बबलू पालवी, सुलोचना हारासिंग सहारे, रोशनी मंगल इपने, नर्मदा सोनू इपने हे ५ जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ५ मजुरांना तातडीने देऊळगाव राजा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने, त्यांना प्राथमिक उपचारांनंतर अधिक उपचारांसाठी जालना येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या या सर्वांवर उपचार सुरु आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मजुरीच्या शोधात आलेल्या कुटुंबांवर ओढावलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.