तुम्हाला मानसिकदृष्ट्या ते मारून टाकतं..; त्या एका समस्येनं पूर्णपणे खचलेला अक्षय खन्ना
सध्या 'धुरंधर' या चित्रपटामुळे तुफान चर्चेत असलेला अभिनेता अक्षय खन्ना एकेकाळी एका समस्येमुळे पूर्णपणे खचला होता. ही समस्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवून टाकते, असं तो म्हणाला. एका मुलाखतीत अक्षय खन्नाने यावर भाष्य केलं होतं.

इन्स्टाग्राम उघडताच सध्या प्रत्येकाच्या फीडवर ‘धुरंधर’मधलं अरबी गाणं आणि त्यावर अक्षय खन्नाने केलेली जबरदस्त एण्ट्री.. हेच पहायला मिळतंय. हा सीन पाहून चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. ‘छावा’नंतर पुन्हा एकदा अक्षय खन्नाचाच बोलबाला होताना दिसत आहे. चित्रपटात खलनायकी भूमिका साकारूनही त्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय. सर्वसामान्यांसह बॉलिवूड इंडस्ट्रीतील सेलिब्रिटीसुद्धा त्याचं कौतुक करत आहेत. बॉलिवूडच्या पार्ट्या, गॉसिप्स यांपासून कायम दूर राहिलेल्या अक्षयने त्याच्या हिशोबाने प्रोजेक्ट्सची निवड केली आणि त्यात आपली विशेष छाप सोडली. परंतु करिअरमध्ये एक काळ असा होता, जेव्हा तो एका समस्येनं प्रचंड त्रस्त झाला होता. ही समस्या होती टक्कलपणाची. कमी वयातच केस गळून टक्कल पडल्याने अक्षय पार खचला होता. याविषयी तो एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाला.
कमी वयातच अक्षय खन्नाला केसांच्या समस्येनं ग्रासलं होतं. ‘बाल्ड लूक’ (टक्कल) हल्ली जरी फॅशन समजलं जात असलं तरी त्याकाळी अभिनयक्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांसाठी ही खूप मोठी समस्या होती. या समस्येमुळे त्याचा आत्मविश्वास डगमगला होता. वयाच्या 19 व्या वर्षापासूनच अक्षयला केसगळतीची समस्या होती, असं म्हटलं जातं. यामुळे त्याला मानसिकदृष्ट्याही बराच त्रास झाला. इतकंच नव्हे तर यामुळे अक्षयच्या करिअरवरही परिणाम झाला होता. परंतु हळूहळू त्याने या समस्येचा स्वीकार केला आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केलं.
अक्षय खन्नाने एका मुलाखतीत टक्कल पडण्याबद्दल भाष्य केलं होतं. “जेव्हा मी आरशात पाहायचो, तेव्हा स्वत:चाच स्वीकार करू शकत नव्हतो. माझा आत्मविश्वास पूर्णपणे संपला होता. यामुळे मानसिक ताणसुद्धा वाढला होता. तो एक प्रकारचा ट्रॉमाच होता. एखाद्या पियानो वाजवणाऱ्याची बोटंच छाटली जावीत.. असंच काहीसं ते होतं. मला स्वत:ला आरशात पहायलाही आवडत नव्हतं. कारण अभिनेता असल्यामुळे माझ्यासाठी ती फार महत्त्वाची गोष्ट होती. वयाच्या 19-20 व्या वर्षीच असं झालं तर ती गोष्ट तुम्हाला मानसिकदृष्ट्या संपवून टाकते”, अशा शब्दांत अक्षयने त्याचा त्रास सांगितला होता.
