“राहुल गांधी यांना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब” ; सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं कुणाला डिवचले

| Updated on: Mar 28, 2023 | 6:35 PM

भाजप आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असल्याचे सांगितले. आम्हाला आमची श्रद्धास्थाने खुर्चीपेक्षा महत्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

राहुल गांधी यांना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब ; सुधीर मुनगंटीवार यांनी नेमकं कुणाला डिवचले
Follow us on

चंद्रपूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सुरत न्यायालयाकडून शिक्षा ठोठवण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. त्यातच राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने भाजप आणि महाविकास आघाडीचे आरोप प्रत्यारोपांचेही राजकारण प्रचंड तापले आहे. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा झाली. त्या सभेवेळी उद्धव ठाकरे यांनी सावरकर हे आमचे दैवत आहेत. त्यांच्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा राहुल गांधी यांना दिला होता.

त्यानंतर त्यावर शरद पवार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केल्यानंतर भाजपकडून त्यांना सत्तेतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मालेगावच्या सभेत राहुल गांधी यांच्यावर सावरकर प्रकरणी टीका केली होती. त्यानंतर आता भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आणि आता सुधीर मुनगंटीवार यांनीही उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा महाविकास आघाडीतून बाहेर पडा असाही सल्ला भाजप आणि शिंदे गटाकडून दिला जात आहे.

त्यामुळेच आता भाजप आणि ठाकरे गट असा सामना रंगला आहे. त्यावरूनच आता वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणी राहुल गांधी यांना समज दिली असेल तर ती आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात बोलताना दिली आहे.

यावेळी त्यांनी भाजप आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत असल्याचे सांगितले. आम्हाला आमची श्रद्धास्थाने खुर्चीपेक्षा महत्वाची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. भविष्यात जर काँग्रेसने ही चूक सुधारली नाही तर जनता आगामी काळात त्यांची चूक नक्की सुधारेल असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.