
एका बाजूला सावकाराचा जाच आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता या दुष्टचक्रात अडकलेल्या चंद्रपूरच्या एका शेतकऱ्याची हतबलता आंतरराष्ट्रीय किडनी तस्करी रॅकेटच्या उघडकीस येण्यास कारणीभूत ठरली आहे. स्वतःला डॉक्टर कृष्णा म्हणवून घेणाऱ्या रामकृष्ण सुंचू (३६) याला चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सोलापूरमधून अटक केली आहे. या अटकेमुळे केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशाबाहेर पसरलेल्या अवयव तस्करीच्या उलगडा होण्याची चिन्हे आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील पीडित शेतकरी रोशन कुडे हे खाजगी सावकारांच्या कर्जामुळे प्रचंड मानसिक तणावात होते. कर्ज फेडण्यासाठी कोणताही मार्ग उरला नसल्याने त्यांनी सोशल मीडियाचा आधार घेतला. फेसबुकवर किडनी विक्री संदर्भात शोध घेत असताना त्यांची भेट डॉक्टर कृष्णा नावाच्या प्रोफाईलशी झाली. आरोपीने रोशन यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांना किडनीच्या बदल्यात लाखो रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर विमानाचे तिकीट आणि इतर कागदपत्रांची पूर्तता करून रोशन यांना कंबोडिया या देशात नेण्यात आले.
कंबोडियातील एका खाजगी रुग्णालयात रोशन कुडे यांची किडनी काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना ठरलेली रक्कम देण्यासाठी आरोपीने टाळाटाळ सुरू केली. केवळ नावापुरते काही पैसे देण्यात आले आणि त्यांना भारतात परत पाठवण्यात आले. भारतात परतल्यावर एका किडनीवर जगताना रोशन यांची प्रकृती खालावली आणि सावकारांचा त्रासही कमी झाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी धाडस करून पोलिसांत तक्रार दिली.
चंद्रपूर पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने तपास चक्रं फिरवली. या तपासात समोर आले की, डॉक्टर कृष्णा हे केवळ एक बनावट नाव होते. या नावामागे रामकृष्ण सुंचू नावाचा एक सराईत एजंट कार्यरत होता. हा आरोपी मूळचा तेलंगणाचा असून तो सोलापूर परिसरात लपून बसला होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे रामकृष्ण हा कोणत्याही प्रकारचा डॉक्टर नसून तो केवळ एक ह्यूमन ट्रॅफिकर म्हणून काम करत होता.
रामकृष्ण सुंचू हा केवळ एक दुवा असून यामागे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. त्या रॅकेटचे टार्गेट कर्जबाजारी शेतकरी, बेरोजगार तरुण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक असू शकतात. तो फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप्सचा वापर करून गरजूंचा शोध घ्यायचा. यासाठी भारतातील विविध शहरांतील एजंट आणि कंबोडिया, व्हिएतनाम सारख्या देशांतील रुग्णालयांचे साटेलोटे असल्याची माहिती समोर आली आहे. आत सुंचूने आतापर्यंत किती लोकांना कंबोडियाला पाठवले आहे आणि या व्यवहारात कोणत्या मोठ्या डॉक्टरांचा किंवा हॉस्पिटल साखळीचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु आहे.