India-Pakistan : ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी सैन्यावरील दहशत कायम, म्हणूनच बॉर्डरवर त्यांनी उचललं एक मोठं पाऊल
India-Pakistan : भारताच्या ऑपरेशन सिंदूरची पाकिस्तानी सैन्यावरील दहशत अजूनही कायम आहे. त्याच भितीपोटी त्यांनी बॉर्डरवर काही पावलं उचलली आहेत. पण ही गोष्ट भारतीय सैन्याच्या नजरेतून सुटलेली नाही. पाकिस्तान सध्या अलर्ट मोडवर आहे.

भारताकडून ऑपरेशन सिंदूरमध्ये मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान अलर्ट मोडवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्य LOC (लाइन ऑफ कंट्रोल) वर अँटी ड्रोन यूनिट्स वेगाने मजबूत करण्याच्या मागे लागलं आहे. संरक्षण सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने LOC ला लागून असलेल्या फॉरवर्ड लोकेशन्सवर ड्रोनची ओळख पटवणारी सिस्टिम आणि जॅमिंग सिस्टिमची तैनाती सुरु केली आहे. आतापर्यंत कमीत कमी 35 विशेष अँटी ड्रोन युनिट्सना आठ पाकिस्तानी सैन्य ब्रिगेड अंतर्गत एलओसीजवळ तैनात करण्यात आले आहेत. ही तैनाती खासकरुन रावळकोट,कोटली आणि भीमबेर सेक्टर्स समोर दिसून आलीय. भारतीय सुरक्षा यंत्रणांसाठी रणनितीक दृष्टीने हा भाग संवेदनशील आहे.
अँटी ड्रोन यूनिट्ससाठी या भागांची निवड केलीय. त्यातून ही गोष्ट दिसून येते की, पाकिस्तान ऑपरेशन सिंदूर दरम्यान समोर आलेल्या भारताच्या ड्रोन आणि लॉयटरिंग म्यूनिशन क्षमतेने खूप त्रस्त आहे. काही कळू न देता लक्ष ठेवणं, टारगेटिंग आणि अचूक हल्ला करण्याच्या भारताच्या क्षमतेने पाकिस्तानी सैन्याची अस्वस्थतता वाढवली आहे. दुर्गम डोंगराळ भागात ड्रोन स्वार्म आणि लॉयटरिंग म्यूनिशनचा सामना करण्याची पाकिस्तानची क्षमता खूप मर्यादीत आहे. म्हणून इस्लामाबादने शस्त्रास्त्रांची खरेदी वाढवली आहे.
300 फतह रॉकेट विकत घेण्याचा करार
मागच्या दोन ते तीन महिन्यात पाकिस्तानने चीन आणि तुर्कीसोबत आपातकालीन शस्त्रास्त्र खरेदी आणि संयुक्त उत्पादनाबद्दल अनेक फेऱ्यांची चर्चा केली आहे. डिफेन्स सूत्रांनुसार, पाकिस्तानी नवीन कमांड अँड कंट्रोल गाड्यांचा समावेश करत आहे. जेणेकरुन युद्ध क्षेत्रात चांगाल समन्वय राहील. त्याशिवाय 300 फतह रॉकेट विकत घेण्याचा करार सुद्धा फायनल केला आहे. त्यामुळे लांब पल्ल्याची मारक क्षमता वाढेल. ड्रोन आणि अचूक वार करणाऱ्या शस्त्रांच्या जमान्यात जुन्या झालेल्या रणगाड्यांच्या जागी नवीन चिलखती प्लॅटफॉर्म खरेदी करण्याची सुद्धा योजना आहे.
