“…त्यामुळे ते वेगवेगळे लढत असावेत”, संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानाचा छगन भुजबळांनी केला खुलासा

या परिचय महासंमेलनापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले.

...त्यामुळे ते वेगवेगळे लढत असावेत, संजय राऊतांच्या त्या विधानाचा छगन भुजबळांनी केला खुलासा
chhagan bhujbal sanjay raut
| Updated on: Jan 12, 2025 | 3:58 PM

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. यानंतर आता महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून महापालिकेची तयारी केली जात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा घेतला आहे. त्यांनी स्वत: त्याबद्दलची घोषणा केली होती. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी संजय राऊतांच्या विधानावर भाष्य केले आहे.

छगन भुजबळ यांनी आज माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे हजेरी लावली. त्यापूर्वी छगन भुजबळ यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन केले. तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना नमन केले. या परिचय महासंमेलनापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संजय राऊतांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निर्णयाबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी थेट वक्तव्य केले.

“सर्वसाधारणपणे ही नेहमीची गोष्ट आहे”

“संजय राऊतांनी महापालिका निवडणुकांबद्दल केलेले वक्तव्य ही काही नवीन गोष्ट नाही. सर्वसाधारणपणे ही नेहमीची गोष्ट आहे. विधानसभा लोकसभेसाठी एकत्र येतात, मग त्यानंतर कार्यकर्ते म्हणतात की आम्हाला कधी उभं राहायला कधी संधी मिळणार, असा प्रश्न विचारतात. आम्ही जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका कधी लढवणार असा प्रश्न विचारतात. त्यामुळे ते वेगवेगळे लढत असतात. हे अनेकदा असं घडलेलं आहे”, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.

“सगळ्यांना न्याय देऊ”

“बीडमधल्या १४० शेतकऱ्यांची वाल्मिक कराडने फसवणूक केली. यावर मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की सगळ्यांना न्याय देऊ. जे गुन्हेगार आहेत त्यांना सोडणार नाही. एक एक कारवाई होत आहे”, असेही छगन भुजबळांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले होते.