Chhath Puja 2026 : इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी..राज ठाकरेंना ओपन चॅलेंज देणारा पंडित सुनील शुक्ला कोण?
Chhath Puja 2026 : काल सगळ्या देशात उत्साहात छठ पूजा संपन्न झाली. पण मुंबई-महाराष्ट्रात मात्र छठ पूजेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न झाला. मनसेला या वादात खेचण्याचा प्रयत्न झाला. छठच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राज ठाकरेंचं नाव घेण्यात आलं.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रात छठ पूजेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, खासकरुन मुंबईत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या वादात खेचण्याचा प्रयत्न झाला. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थोडी संयमाची भूमिका घेतली. मात्र, तरीही राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित सुनील शुक्ला यांनी छठ पूजेच्या निमित्ताने राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
सुनील शुक्ला म्हणाले की, “एक वर्षापूर्वी राज ठाकरे बोलले होते की, ज्याला मराठी बोलता येत नाही, त्याच्या कानाखाली मारा. त्यानंतर मी सुप्रीम कोर्टात जाऊन त्यांच्याविरोधात केस केली. कारण माझा समाज मार खाण्यासाठी इथे आलेला नाही”
“इथे कोणताही माईचा लाल उत्तर भारतीयांवर भारी पडेल, तर मी सुनील शुक्ला मध्ये उभा दिसेल. हा समाज झुकणार नाही. जे लोक इथे कायमस्वरूपी राहणारे आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, पुढे संघर्ष खूप जास्त होणार आहे. एकत्र या जेणेकरून आपण ताकद दाखवून देऊ की महाराष्ट्रात काय करू शकतो” असं सुनील शुक्ला बोलले. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेची काय भूमिका आहे ते लवकरच समजेल.
चांदिवली विधानसभेत छटपूजा उत्साहात साजरी
चांदिवली विधानसभेत छटपूजा उत्साहात साजरी झाली. आमदार दिलीप मामा लांडे यांचा उत्तर भारतीय पेहरावाची चर्चा झाली. शितल तलाव येथे छटपूजेनिमित्त मोठ्या संख्येने उत्तर भारतीय बांधवांनी एकत्र येत छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. हिंदू धर्मातील परंपरा आणि संस्कृतीनुसार दरवर्षी रामनवमी, कावड यात्रा आणि छटपूजा सण मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार अशी प्रतिक्रिया दिलीप मामा लांडे यांनी दिली.
सोनू सूद यांचाही विशेष सन्मान
शिवसेना नेते संजय निरुपम आणि बिहारी फ्रंटतर्फे जुहू चौपाटीवर 29 व्या भव्य छठपूजा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते तसेच शेखर सुमन, सोनू सूद आणि तमन्ना भाटिया यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध अभिनेते, गायक आणि टेलिव्हिजन होस्ट शेखर सुमन यांना कला आणि मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘‘बिहार गौरव’’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तसेच, बिहारमध्ये आलेल्या भीषण पुराच्या काळात पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढाकार घेऊन माणुसकी आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते आणि समाजसेवक सोनू सूद यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.