एकेकाळी एकमेकांच्या गळ्यातल्या ताईत, जिवाभावाच्या मैत्रिणी, पण आज…, पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 08, 2023 | 12:06 AM

कधीकाळी राष्ट्रवादीत असलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या चित्रा वाघ या रुपाली चाकणकरांच्या जिवाभावाच्या मैत्रीण होत्या. पण या दोन मैत्रिणींमध्ये आता टोकाचं वितुष्ट निर्माण झालंय. चित्रा वाघ यांनी पक्ष बदलल्यानंतर दोघींमधल्या संघर्षात मोठी भर पडलीय.

एकेकाळी एकमेकांच्या गळ्यातल्या ताईत, जिवाभावाच्या मैत्रिणी, पण आज..., पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

मुंबई : कधीकाळी ज्या दोघी एकमेकांच्या गळ्यातल्या ताईत होत्या. कधीकाळी ज्या दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी होत्या. त्याच दोघी आता एकमेकांना दूषणं का देऊ लागल्या आहेत? एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीच्या डोळ्यात का खुपू लागलीय? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. सध्या महाराष्ट्रभर गाजत असलेला मुद्दा आहे तो अभिनेत्री उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांचा. याच उर्फी जावेदवरुन चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत. पण दोघींमधला हा वाद काही आत्ता सुरु झालेला नाहीय. चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली होती.

सुरुवातीला हा वाद दोन पक्षांमधल्या टीका-टिप्पणीपर्यंतच मर्यादीत होता. पण सध्या तो वाद वैयक्तिक पातळीपर्यंत पोहोचल्यासारखा झालाय.

चित्रा वाघ ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपमध्ये गेल्या.तेव्हा त्या दबावाखालीच गेल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केला होता.

हे सुद्धा वाचा

त्यानंतर चित्रा वाघ यांच्याकडे असलेलं राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकरांकडे आलं. आणि तिथूनच दोघींमध्ये ठिणग्या पडायला सुरुवात झाली.

चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये पहिल्यांदा वाद झाला तो हिंगणघाट जळीतकांड प्रकरणावरुन. महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये एका तरुणीला जिवंत जाळण्यात आलं होतं. त्यावरुन चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

वाघ आणि चाकणकर पुन्हा आमनेसामने आल्या त्या पुण्यातल्या रघुनाथ कुचिक प्रकरणात. शिवसेना नेते असलेल्या रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या एका युवतीनं बलात्काराचे आरोप केले होते.

या प्रकरणात चित्रा वाघ यांनी रान उठवलं. पण त्या युवतीनं काही दिवसातच तक्रार मागे घेत चित्रा वाघ यांच्यावरच उलट आरोप केले.

भाजप नेते नरेंद्र मेहता प्रकरणावरुनही या दोघी आमनेसामने आल्या. नरेंद्र मेहतांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोघींमध्ये ट्विटरवॉर रंगलं होतं.

राज्य महिला आय़ोगाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवेळीही चित्रा वाघ यांनी चाकणकर यांचं नाव न घेता शूर्पनखा असं ट्विट केलं होतं. आता उर्फी जावेदवरुन सुरु झालेला सामना वैयक्तिक पातळीपर्यंत गेल्यासारखा दिसतोय.

चित्रा वाघ आणि चाकणकर जेव्हा एकाच पक्षात होत्या तेव्हाचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत. पक्ष बदलला की भूमिका बदलावी लागते. पक्षाचे विचार ठामपणे मांडावे लागतात. एकमेकांवर टीकाही करावी लागते. पण हे सगळं करताना काही मर्यादा पाळून मैत्रीही जपावी लागते.

महाराष्ट्रात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केलाय. पण महाराष्ट्रातल्या या दोन महिला नेत्यांमधलं राजकीय वैर मात्र वैयक्तिक टीका-टीप्पणीपर्यंत येऊन ठेपलंय.