
राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे आज महिला आयोगाबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत महिलांच्या सुरक्षेबाबत महत्वाची चर्चा झाली. या बैठकीला राज्यातील अनेक महिला नेत्या उपस्थित होत्या. या बैठकीनंतर चित्रा वाघ यांनी बैठकीबाबत माहिती आहे, त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
महिला आयोगाबाबतच्या या विशेष बैठकीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितले की, ‘आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली, सर्वांनी चांगले इनपूट दिले. महिला आयोगाला ताकद देण्याची गरज आहे. महिला आयोगात काही लुप होल आहेत, त्यावर काम करावं लागणार आहे. त्यामुळे आगामी काळात याबाबत आणखी बैठका होणार आहे.’
पुण्यातील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्तेच्या घटनेनंतर विरोधकांकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर बोलताना चित्रा वाघ यांनी म्हटले की, ‘मी सुद्धा या पदावर काम केलं आहे. एका व्यक्तीला टार्गेट करुन प्रश्न सुटणार नाही.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनी त्यांची बाजू समजून तर घ्यायला हवी.’
पुढे बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, राज्य महिला आयोगाकडे मेलद्वारे अनेक महिला तक्रार करत असतात. मात्र मेल वाचायला आणि त्याला रिप्लाय द्यायला माणसं नाहीत. त्यामुळे एका व्यवस्थेला टार्गेट करुन चालणार नाही. एक केस नाही तर प्रत्येक केसमध्ये महिला आयोगामध्ये अननियमितता झाली असेल तर त्याची चौकशी होईल. महिला आयोग कुठे चुकले ,भरोसा सेल कुठे चुकला याची चौकशी होईल.
अध्यक्ष राजकीय नसावा का?
महिला आयोगाचा अध्यक्ष राजकीय नसावा अशी मागणी काही विरोधकांनी केली आहे. याबाबत बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, महिला आयोगाचा अध्यक्ष राजकीय नसावा असं जे म्हणत आहे त्यांच्याही कार्यकाळात राजकीय अध्यक्ष होता. रुपाली चाकणकर यांची ही दुसरी टर्म आहे. विरोधकांच्या कार्यकाळातही राजकीय व्यक्तीकडेच महिला आयोगाचे नेतृत्व होते.