मला जेलमध्ये टाकलं तर…, अभिजीत दिपकेंनी नेमकं काय म्हटलं? CJP च्या आंदोनापूर्वीच वातावरण तापलं
2029 मध्ये जी निवडणूक होईल, त्यामध्ये मतदार म्हणून सर्वाधिक संख्या ही जेन झेडची असणार आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतं? त्यांना देश कसा पाहिजे? तसा देश देणं ही आपली जबाबदारी आहे, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे, विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विरोधी पक्षांकडून निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप होत आहे. सहा ऑक्टोबर रोजी सर्व विरोधी पक्ष मिळून दिल्लीमधील मुख्य निवडणूक कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. परंतु त्यापूर्वी आता मुंबईत देखील वातावरण चांगलंच तापलं आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने देखील ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. उद्या मुंबईमध्ये या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले दिपके?
2029 मध्ये जी निवडणूक होईल, त्यामध्ये मतदार म्हणून सर्वाधिक संख्या ही जेन झेडची असणार आहे. त्यामुळे त्यांना काय वाटतं? त्यांना देश कसा पाहिजे? तसा देश देणं ही आपली जबाबदारी आहे. ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे देशाचे गद्दार आहेत, असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे. दरम्यान एसआयआरची यादी गोठवा, 2025 ची जी निवडणूक आहे, त्याच निवडणूक यादीवर पुन्हा निवडणूक झाली पाहिजे. निवडणूक आयोगाची कार्यपद्धती ही पूर्णपणे पारदर्शक पाहिजे, अशी मागणीही यावेळी अभिजीत दिपके यांनी केली आहे.
जर राजीनामा झाला नाही तर 2023 पासून जे 13 कोटी मतदान वगळण्यात आलं आहे, त्यासाठी अख्खा देश ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले. आम्हाला ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा याच्यासाठी हवा आहे की, लोकांचा विश्वास पूर्णपणे निवडणुकीवरून उडालेला आहे. लोकशाहीमध्ये आपलं सरकार कोण असणार हे लोकं ठरवतात. परंतु इथे आपले मतदार कोण असणार? हे सरकार ठरवत आहे. ही तणाशाही आहे. ही ताणाशाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह करत आहेत, आणि ज्ञानेश कुमार हे त्यांचे पपेट आहेत, त्यामुळे ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा झालाच पाहिजे. उद्या ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू करणार आहोत. मला जर जेलमध्ये टाकलं तर मी पुन्हा येईल, आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण देशभरात आंदोलन करणार आहोत, आणि त्यानंतर दिल्लीच्या जंतर -मतंरवर आंदोलनाला बसू असंही यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.