
संगमनेर नगर परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात यांची जादू दिसून आली. संगमनेर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. मैथिली तांबे यांनी बाजी मारली. बाळासाहेब थोरात यांनी मागच्यावर्षी विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा या निवडणुकीच्या निमित्ताने काढला. बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे या मामा-भाचा जोडीने हा विजय खेचून आणला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांना धक्का बसला. हा अप्रत्यक्षपणे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांच्यासाठी सुद्धा धक्का आहे. कारण संगमनेर भागात विखे पाटील आणि थोरात हा जुना राजकीय संघर्ष आहे. विखे-पाटील हे अमोल खताळ यांचे मार्गदर्शक मानले जातात.
विजयानंतर बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केलं. “शहरात फ्लेक्स बाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल. सुंदर शहर,स्वच्छ शहर याकडे लक्ष द्यायचं आहे. बस स्थानक देखील स्वच्छ ठेवावे लागेल. जो विश्वास टाकला त्याला सार्थ करण्याच काम आपण करायचय. अंमली पदार्थ येतात कसे हे पोलिसांनी तपासावं, गुंडगिरी चाललीय. बंदोबस्त करू म्हणतात, त्यांचाच बंदोबस्त करावा लागेल” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
संगमनेरची रेल्वे कोणी घालवली ?
“बेकायदेशीर टोल नाके बंद करावे लागतील. निळवंडे धरण करण्यात माझा मोठा वाटा आहे. आम्ही केल्याचा अभिमान आहे. नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मधूनच न्यावी. अकोलेत पण रेल्वे हवी. संगमनेरची रेल्वे कोणी घालवली ?. कोणाच्या हातातील बाहूल होवून संगमनेरच नुकसान करणाऱ्यांचा बंदोबस्त करा” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.
मग फिनलँडला जा
“उद्या 10 वाजता पदभार घ्या, आणि लगेच रस्ता साफ करायला यायच. मग फिनलँडला जा, सहा महिने अगोदरच तुमचं ठरल होतं. त्यामुळे मी काही बोलत नाही. तेव्हा नगराध्यक्ष पदाचे ध्यानातही नव्हते. सर्वांना चांगल काम करायचय. शहरासोबत तालुका दुरुस्त करावा लागेल. दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल. ज्यांनी पाठींबा दिला त्या पक्ष आणि संघटनांचे आभार” असं बाळसाहेब थोरात म्हणाले.