मोठी बातमी | काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ निष्ठावंत नेत्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश

| Updated on: Mar 11, 2023 | 5:55 PM

कर्जत येथील शेतकरी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते.

मोठी बातमी | काँग्रेसला मोठा धक्का, या निष्ठावंत नेत्यासह शेकडो कार्यकत्यांचा भाजप प्रवेश
Follow us on

सागर सुरवसे, अहमदनगर | महाराष्ट्रात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला (Congress) आज भाजपकडून आणखी एक धक्का बसला आहे. गेल्या30 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्याने आज भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात कर्जत-जामखेडमध्ये हा पक्षप्रवेश झाला. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये एकिकडे नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी दबक्या आवाजात सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कर्जत जामखेड मतदारसंघातील प्रवीण घुले यांनी भाजपात प्रवेश केल्याने या ठिकाणी आता महाविकास आघाडीसमोरील आव्हानं आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.

राजकीय भूकंप

भाजप नेते राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीत कर्जत जामखेड मध्ये लवकरच राजकीय भूकंप होणार असल्याचं सूतोवाच केलं होतं. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. प्रवीण घुले हे कर्जत येथील काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. प्रवीण घुले यांचा कर्जत जामखेड तालुक्यात चांगलाच जनसंपर्क आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाला याचा मोठा फायदा होऊ शकतो. भाजप नेते राम शिंदे यांची काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेवर निवड झाली आहे. विधान परिषद निवडणूक झाल्यानंतर राज्यात मविआ सरकार कोसळलं. सत्तांतर झालं आणि शिंदे-भाजप युतीचं सरकार आलं. त्यानंतर आता भाजपमध्ये येणाऱ्यांचा ओघ वाढलेला दिसून येतोय.

शेतकरी मेळाव्यात फडणवीस काय म्हणाले?

कर्जत येथील शेतकरी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेदेखील या सोहळ्याला उपस्थित होते. राज्यातील जलयुक्त शिवार मागील सरकारने बंद केली. मात्र जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा कालच्या अर्थसंकल्पात सुरु करण्याची घोषणा आम्ही केली. तसेच अण्णा हजारे यांच्या आवडती गाळमुक्त धरण, दाळयुक्त शिवार ही योजना पुन्हा सुरु केली आहे. जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याचा निचरा थांबवून प्रत्येक गाव जलस्वयंपूर्ण करण्याच्या संदर्भात प्रयत्न सुरु केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.