कोल्हापुरच्या गोकुळ निवडणुकीनंतर हसन मुश्रीफांकडून चूक कबूल; सतेज पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद, कोण काय म्हणाले?
कोल्हापुरच्या गोकुळ निवडणुकीनंतर हसन मुश्रीफांनी चूक कबूल केली आहे. मुश्रीफांच्या विधानावर सतेज पाटील यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.

कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांना उघड आणि टोकाचे इशारे दिले होते. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड केल्यानंतर आता राजकारण आणि वाद थोडाफार निवळण्याची शक्यता आहे. ‘आमच्या सभेत रागात बोललो. आमची चूक झाली, आता गोकुळचा विषय संपलेला आहे. गोकुळमधील वाद जगभर पसरवण्यात आलाय. आता त्याला विश्राम द्यावा, असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी वाद आणि आरोप-प्रत्यारोपांचं सत्र थांबवण्यात आवाहन केलं. हसन मुश्रीफ यांच्या आवाहनाला सतेज पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. मी त्यांच्या वक्तव्याचे स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले.
सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कोल्हापुरातील राजकारण आणि गोकुळच्या निवडणुकीवर भाष्य केलं. गोकुळच्या निवडणुकीवर सतेज पाटील म्हणाले, ‘आम्ही प्रशासक आणू आणि घरी घालवण्याची भाषा वापरण्यात आली. सत्तेचा वापर कशाही पद्धतीने करू शकतो. हे अध्यादेशातून सांगण्याचा प्रयत्न झाला. चंद्रकांत पाटील यांनी सरकारी यंत्रणेचा वापर करून उद्ध्वस्त करु, अमकं करु, असे म्हटले. परंतु ही भाषा कधीपासून चालू झाली. डी.वाय. पाटील यांच्याबाबत वक्तव्य करण्यात आलं. ते महाराष्ट्रातील कोणत्याही सुजाण नागरिकाला आवडलेलं नाही. चंद्रकांत पाटलांचा तोल घसरला होता. चंदक्रांत पाटील यांच्या वक्तव्यावरून हसन मुश्रीफ यांनी समजुतदारपणा दाखवत हा विषय घ्यायला नको होता, असे म्हटलं. मी त्याचं स्वागत करत असल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
सतेज पाटील यांनी गोकुळ निवडणुकीतील अनेक राजकीय घडामोडी सांगितल्या. गोकुळच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मी मतमोजणी केंद्रावर निघालो होतो. त्यावेळी शरद पवारांचा फोन आल्याचे सतेज पाटलांनी सांगितले. मतमोजणी सुरू होती. त्यादिवशी शरद पवार यांचा फोन आल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले. मतमोजणीच्या दिवशी ज्यावेळी मतमोजणी पूर्ण होत नव्हती. त्यावेळी शरद पवारसाहेबांचा चार किंवा पाच वाजता फोन आला होता. कदाचित त्यांना कोणी सांगितलं किंवा बघितलं असेल. त्यामुळे त्यांचा फोन आला. पवारसाहेबांचा फोन आल्यानंतर त्यांनी विचारलं काय चाललंय. मी त्यांना सांगितलं की, साहेब जरा गोंधळ चाललाय. शरद पवार साहेबांनी एक सूचना केली. मतमोजणी होऊन सगळा निकाल हातात लागेपर्यंत, प्रमाणपत्र हाती पडेपर्यंत तू मतमोजणी केंद्र सोडू नको, असं सतेज पाटील यांनी सांगितलं.