Water Crisis: ऐन हिवाळ्यात मराठवाड्यासह विदर्भ तहानला, पाणी टंचाईच्या तीव्र झळा, टँकरच्या फेऱ्या वाढल्या, या जिल्ह्यांवर भीषण जल संकट
Maharashtra Water Crisis: एकीकडे थंडीची चाहुल लागलेली असतानाच मराठवाड्यासह विदर्भाच्या घशाला कोरड पडली आहे. पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत. टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. अनेक जिल्ह्यांवर भीषण जलसंकट उभं ठाकले आहे.

Maharashtra Drought : राज्यात दिवसागणिक दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात थंडी जाणवत असली तरी मराठवाड्यासह विदर्भाच्या घशाला कोरड पडली आहे. अनेक जिल्ह्यात पाणी संकट उभे ठाकले आहे. टँकरच्या फेऱ्याही वाढल्या आहेत. अनेक ग्रामपंचायती, नगरपालिका आणि महानगरपालिकांनी पाणी कपात जाहीर केलेली आहे. अजून तर उन्हाळा यायचा आहे, अशावेळी कसे निभावेल या चिंतेत नागरिक आहेत. प्रशासनाकडून वेळीच उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई, 601 टँकरद्वारे पाणी पुरवठा
मराठवाड्यात यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे भूजल पातळी खालावली असून, नोव्हेंबर महिन्यातच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विभागातील 379 गावे आणि 249 वाड्यांना सध्या 601 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात सर्वाधिक 296 टँकर सुरू असून, 174 गावे आणि 183 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 119 गावे आणि 34 वाड्यांसाठी 179 खासगी टँकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यात 71 गावे आणि 32 वाड्यांना 103 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर धाराशिव जिल्ह्यातील 15 गावांसाठी 23 खासगी टँकर सुरू आहेत. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील एकूण 601 टँकरपैकी 5 शासकीय, तर 596 खासगी टँकर आहेत. आगामी काळातील पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने 3 ते 4 हजार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे.
या जिल्ह्यात टँकरच्या फेऱ्या
बीड- गावे : 174, वाड्या : 183, टँकर : 296
छत्रपती संभाजीनगर- गावे : 119, वाड्या : 34, टँकर : 179
जालना – गावे : 71, वाड्या : 32, टँकर : 103
धाराशिव – गावे : 15, वाड्या : 0, टँकर : 23
मराठवाडा- एकूण – गावे – 379 / वाड्या – 249 / टँकर – 601
टँकरचे प्रकार- शासकीय टँकर – 5, खासगी टँकर – 596, एकूण टँकर – 601
माजलगाव धरणात केवळ १९.७१% पाणीसाठा शिल्लक
बीड आणि माजलगाव शहरांची तहान भागविणाऱ्या माजलगाव धरणात सध्या केवळ १९.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणाची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ३१२ दशलक्ष घनमीटर असून, आजमितीस यामध्ये ६१.५ दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत पाणी साठ्यात मोठी घट झाली आहे. झपाट्याने घटत्या पाणीसाठ्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अप्पर वर्धा धरणात 41 टक्के इतकाच जलसाठा
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ 41 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी होता 100 टक्के जलसाठा; मागील वर्षीच्या तुलनेत अप्पर वर्धा धरणात 60 टक्के जलसाठा मध्ये घट झाली आहे. सिंचन विभागाच्या वतीने ऑगस्ट 2017 पर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळामध्ये पाणी वाटपात कपात होण्याची शक्यता आहे. यावर्षी शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी मिळणं अशक्य आहे.
बुलढाणा जिल्ह्यात जलसंकट
बुलढाणा जिल्ह्यात यंदा पावसाने ओढ दिल्यानंतर आता उपलब्ध जलसाठ्याची चिंता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील ५२ प्रकल्पांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी २४८.७५३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा होता, मात्र, १२ नोव्हेंबरपर्यंत हा साठा घटून २२०.९७५ दलघमीवर आला आहे. म्हणजेच अवघ्या २८ दिवसांत तब्बल २७.७७८ दलघमी पाण्याची घट झाली असून सध्या एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ४७.५४ टक्के शिल्लक आहे.. एकीकडे ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवण्याचे नियोजन अपेक्षित असताना दुसरीकडे नेमके कोणत्या गावासाठी आणि शहरासाठी किती पाणी आरक्षित केले, याचा तपशील अद्याप प्रशासनाने जाहीर केलेला नाही. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्येही जलसाठा झपाट्याने कमी होत आहे. पेनटाकळी प्रकल्पात ७.७५१ दलघमी, तर नळगंगा प्रकल्पात ४.४६० दलघमी पाण्याची घट नोंदवण्यात आली आहे. दुसरीकडे खडकपूर्णा प्रकल्पाचा उपयुक्त साठा शून्यावर असून, तेथे ५३.९०६ दलघमी मृतसाठा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ९२१ गावांमधील १७ लाख ५२ हजार नागरिक आणि ६ लाख १८ हजार पशुधनासाठी ४२.४६ दलघमी पाणी आरक्षित करण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती आहे.
