Vidarbha Rain : चंद्रपुरात संततधार सुरूच, धानोलीत घरात शिरले पाणी, वाशिममध्ये शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली

| Updated on: Jul 10, 2022 | 7:26 PM

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. 48 तासांपेक्षा अधिक काळापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोरपना तालुक्यातील धानोली तांडा क्रमांक दोन येथील बारा ते पंधरा घरात पुराचे पाणी शिरले आहे.

Vidarbha Rain : चंद्रपुरात संततधार सुरूच, धानोलीत घरात शिरले पाणी, वाशिममध्ये शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली
घरात पाणी गेल्याने गावकऱ्यांनी रात्र जागून काढली
Image Credit source: t v 9
Follow us on

नागपूर : सध्या गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा फटका भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा, सिरोंचा या पाच तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत आहे. गडचिरोली येत्या 72 तासांत विदर्भासह गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. सर्व यंत्रणांना हाय अलर्ट (Alert) जारी करण्यात आलंय. पुढील 72 तास जिल्हयात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने अंदाज (Forecast) वर्तवला. जिल्हाधिकारी संजय मीना (Collector Sanjay Meena) यांनी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना तातडीने मुख्यालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून आव्हान करण्यात येत आहे की पुढील 72 तास मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे कोणीही विनाकारण बाहेर पडू नये. मुसळधार पावसादरम्यान विविध ठिकाणी नाले पुलावरून पाणी वाहत असताना कोणीही पूल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.

धानोलीतील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. 48 तासांपेक्षा अधिक काळापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोरपना तालुक्यातील धानोली तांडा क्रमांक दोन येथील बारा ते पंधरा घरात पुराचे पाणी शिरले आहे. घरात पाणी गेल्याने गावकऱ्यांनी रात्र जागून काढली. घरातील अन्नधान्य व सामानाचे नुकसान झाले आहे.या नुकसानीची त्वरित मदत मिळावी अशी मागणी गावक-यांनी केली आहे. जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात अड्याळ जानी येथे वीज पडून मासेमारी करणाऱ्या इसमाचा मृत्यू झालाय. सावली शहरात विविध भागात पावसाचे पाणी शिरून घरांचे नुकसान झाले आहे.

घरातील अन्नधान्य व सामानाचे नुकसान झाले आहे

वाशिममध्ये शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली

वाशीमच्या पेन बोरी, देगावसह इतर ठिकाणी आज सायंकाळ दरम्यान ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने 1 तासात नदी नाल्यांना पूर आला. पेनबोरी गावानजीकच्या नाल्याला पूर आल्याने गावातील रस्ता बंद झाला होता. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना साखळी करून ग्रामस्थांनी रस्ता ओलांडून बाहेर काढले. या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. खरिपाच्या कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

यवतमाळात नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील बेंबळा नदी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. प्रकल्पाच्या जलाशय पातळीत वाढ होत असल्याने प्रकल्पातील जलाशयांची पातळी 266.10 मिमी व जिवंत पाणीसाठा 83.36 दलघमी म्हणजे 45.32 टक्के झाला आहे. जलाशय पातळी नियंत्रणात ठेवण्याकरिता व धरण सुरक्षिततेच्यादृष्टीने जलाशयात येणाऱ्या पावसाच्या प्रमाणात नदीपात्रात धरणाचे दोन वक्रदरवाजे 25 सेमीने उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सर्व संबंधित यंत्रणा यांना नदीच्या दोन्ही काठांवरील गावांना सतर्कतेचा इशारा व खबरदारी घेण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

गोंदियात दिवसाच रात्रीचा आभास

गोंदिया जिल्ह्यात आज संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील जनतेला उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला. भात रोवणीला मोठ्या प्रमाणात वेग आलेला आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह आलेल्या या पावसामुळे दिवसाच अंधाराचे साम्राज्य पसरले होते. या मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या मान्सूनमधील सर्वात जास्त हा पाऊस पडलेला आहे.