
संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण आहे. प्रत्येक महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी दादर स्थानकाचं चैत्यभूमी असं नामकरण करण्याची मागणी होत असते. कालही भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी या नामांतरासाठी शांततेत निदर्शने केली. आज पुन्हा या नामांतराच्या मागणीने जोर धरला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी दादरच्या मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी नाव देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या मागणीने पुन्हा जोर धरला असून सत्ताधारी आणि विरोधकांनी त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांनी आज सकाळीच चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दादरच्या मेट्रो स्थानकाला चैत्यभूमी असं नाव देण्याची मागणी केली. आज चैत्यभूमीवर अफाट जनसागर आला आहे. जवळपास 15 ते 20 लाख लोक येतील असं सांगण्यात आलं आहे. चैत्यभूमीवर ठिकठिकाणी पुस्तकांचं प्रदर्शन भरलं असून चार कोटी रुपयांच्या पुस्तकांची यावेळीही विक्री होण्याचा अंदाज आहे. अत्यंत शिस्तबद्धपणे अनुयायी येत असून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत, असं नरेंद्र जाधव म्हणाले.
इंदू मिल स्मारकासाठी समिती नेमा
पालिकेने अत्यंत उत्तम नियोजन केलं आहे. पालिकेकडून बाबासाहेबांवरील एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. सर्वांनी एकत्र येऊन चैत्यभूमीवरील सुविधांसाठीचं काम केलं आहे. चांगली सेवा देण्यात येत आहे, असं सांगतनाच इंदू मिल स्मारकाचं काम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ समन्वय समिती नेमावी. तसेच दादर मेट्रो स्टेशनला चैत्यभूमी असं नाव देण्यात यावं. ही मी आंबेडकरी जनतेच्या वतीने मागणी करतो, असं नरेंद्र जाधव यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री निर्णय घेतील
दरम्यान, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र जाधव यांच्या मागणीचं स्वागतच करत आहोत, असं म्हटलंय. आम्हीही गेल्या अनेक वर्षापासून दादर स्थानकाच्या नामांतराची मागणी करत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. तर, दरवर्षीप्रमाणे यंदाही मी चैत्यभूमीवर आले आहे. बाबासाहेबांमुळेच आमचं अस्तित्व आहे. त्यांचे आमच्यावर कोटी कोटी उपकार आहेत, असं सांगतानाच नरेंद्र जाधव यांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक विचार करतील, असं भाजप नेत्या चित्रा वाघ म्हणाल्या.
स्मारक लवकरच तयार होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम सुरू आहे. पुढच्या सहा डिसेंबरपर्यंत आम्ही इंदू मिल स्मारक पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असं फडणवीस यांनी सांगितलं.