दराडेंचा पराभव होताच मोठ्या घडामोडी, प्लान बी तयार, गोकुळ गीतेंना मोठी ऑफर, स्पेशल विमान धाडलं; काय घडतंय?
नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडेंच्या पराभवानंतर शिंदे गट सक्रिय झाला आहे. अपक्ष विजयी गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी 'प्लॅन बी' तयार केला. मंत्र्यांनी गीतेंच्या सहकाऱ्याशी संपर्क साधून शिवसेनेच्या पक्षप्रवेशाची ऑफर दिली, तसेच मुंबई भेटीसाठी खास विमानाची सोय केली. आता गीते कोणता निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.

विधान परिषद निवडणुकीत नाशिकमधून अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे. तर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे शिंदे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे. शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. या पराभवाला दराडे यांनी शिंदे वगळता महायुतीच्या सर्व नेत्यांना जबाबदार धरलं आहे. असं असताना एकनाथ शिंदे यांनी मात्र वेगळीच चाल खेळायला सुरुवात केली आहे. गोकुळ गीतेंना शिवसेनेत घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तशी ऑफरच गीते यांना दिली आहे. त्यामुळे आता गीते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नाशिकचा धक्कादायक निकाल आल्यानंतर अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पहिला फोन जाण्याऐवजी शिंदे गटाकडून गोकुळ गीते यांच्या विश्वासू सहकाऱ्याला पहिला फोन करून गीतेंना शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. गोकुळ गीते यांचे विश्वासू नाना गामने यांना मंत्री उदय सामंत यांनी फोन केला आहे. गोकळ गीते यांना शिवसेना पुरस्कृत करावे, अशी मागणीच उदय सामंत यांनी केली आहे. मंत्री उदय सामंत नाशिकमध्ये दाखल झाल्यानंतर गोकुळ गीते यांना भेटण्यासाठी घेऊन या केली अशी देखील विनंती केली आहे.
स्पेशल विमान येणार
दरम्यान, गोकुळ गीते यांचे विश्वासू सहकारी नाना गामने यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला उदय सामंत यांचा फोन आला होता. मुंबईला एकनाथ शिंदे यांच्या भेटीला या असं सांगण्यात आलं. पण आम्हाला येताना ट्रॅफिक लागेल, असं आम्ही त्यांना सांगितलं. त्यावर त्यांनी खास विमान पाठवून देतो म्हणून सांगितलं. 1 वाजेपर्यंत ओझर विमानतळावर विमान येणार आहे. आम्ही मुंबईला जात आहोत. एकनाथ शिंदे यांचे आशीर्वाद घेणार आहोत, असं नाना गामने म्हणाले.
चर्चेला नव्हे, आशीर्वाद घ्यायला…
गोकुळ गीते यांना उदय सामंताकडून शिवसेनेत येण्याची ऑफर देण्यात आली आहे. मुंबईला गेल्यानंतर चर्चा करून शिवसेनेत प्रवेश करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं. तर, आम्ही चर्चेला नाही तर आशीर्वाद घ्यायला जात आहोत, असं नानांनी सांगितलं. जनता आणि मतदारांनी निवडणूक हाता घेतली होती. त्यामुळे हा निकाल आला, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.