अजित पवारांची सर्वात मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मिळणार इतक्या रुपयांची मदत

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदत घोषणा केली आहे. पाच हजार रुपये रोख आणि धान्याची मदत प्रभावित शेतकऱ्यांना तात्काळ मिळेल.

अजित पवारांची सर्वात मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मिळणार इतक्या रुपयांची मदत
| Updated on: Sep 25, 2025 | 1:50 PM

बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बीड जिल्ह्याचा दौरा केला. या अतिवृष्टीने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर आल्याने शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.

अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची घोषणा केली. या संकटाच्या काळात शासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. ज्यांच्या घरात पावसाने जास्त नुकसान झाले आहे. त्यांना आजपासूनच तातडीची मदत दिली जाईल. तात्काळ पाच हजार रुपये रोख आणि काही धान्य देण्याचे शासनाने ठरवले आहे, असे अजित पवार म्हणाले.

नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न सुरु

यावेळी अजित पवारांनी दौऱ्याला उशीर झाल्याबद्दल स्पष्टीकरण दिले. मी काल रात्रीच बीडमध्ये पोचलो. त्यामुळे पाहणी करण्यासाठी थोडा उशीर झाला. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्र्यांनीही विविध ठिकाणी भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे,” असे त्यांनी सांगितले. या संकटातून नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी राज्य सरकार आणि सर्व प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही

त्यासोबतच अजित पवार यांनी लोकांना एक कळकळीची विनंती केली. हात जोडून माझी विनंती आहे की, या संकटाचा कोणीही गैरफायदा घेऊ नका. तसेच, फोन आणि पैशांच्या व्यवहारांबाबत काळजी घ्या. तुमचा पालकमंत्री या नात्याने मी वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत आहे. तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, याची खात्री बाळगा.” असे अजित पवार म्हणाले.

हवामान खात्याने पुढील काळातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवली असल्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांना मदत करणे हेच आमचे धोरण आहे. कोणीही गैरसमज पसरवून राजकारण करू नये. तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीतून बाहेर कसे पडता येईल, याचा विचार करायला हवा. शासन तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.