शरद पवार यांचे राजकीय टायमिंग !, ज्येष्ठ पत्रकाराची पोस्ट चर्चेत..

डीलिमिटीशन बिलामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली असताना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना पुन्हा इंडिया आघाडीत बोलवण्यासाठी त्यांची आर्जवे करावी लागत आहेत. या बिलाला पाठींबा देऊ इच्छीणारे त्यांचे ज्येष्ठ सहकारी शरद पवार आणि स्टॅलिन यांची त्यांना मनधरणी करावी लागत आहे.

शरद पवार यांचे राजकीय टायमिंग !, ज्येष्ठ पत्रकाराची पोस्ट चर्चेत..
sharad pawar ( pti )
| Updated on: Nov 29, 2026 | 5:57 PM

डिलिमिटीशन बिलामुळे इंडिया आघाडीला तडे गेले आहेत. शरद पवार या विश्वासू सहकाऱ्याने अचानक या बिलाला पाठिंबा देण्याचा पवित्रा घेतल्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी एकटे पडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या बुजुर्ग नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची भगदाडे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या कामाला आता उशीर झाला असल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लागवला आहे. डीएमकेचे स्टॅलिन आणि शरद पवार यांच्या मनधरणीचा प्रयत्न मायलेकाने सुरु केला आहे. दुसरीकडे पवारांच्या राजकीय वारसदार सुप्रिया सुळे यांना युवा नेते रोहित पवार यांनी पत्र लिहिले आहे. या घडामोडींवर पवार यांना आता या वयात लेकीसाठी खिंड लढवावी लागत असल्याचे म्हटले जात आहे. शरद पवार यांचे राजकीय टायमिंगवर एका ज्येष्ठ पत्रकाराने केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

शरद पवार यांचे राजकीय टायमिंग ही पोस्ट नेमकी काय ?

पवारांचे राजकीय टाइमिंग!

भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी एकदा शरद पवार यांच्या नशिबाचा एक किस्सा सांगितला होता. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवणार होते. सर्व काही ठरले होते; मात्र ऐनवेळी शरद पवार साहेबांनी माघार घेतली. भाजपला त्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पवार तब्बल १० वर्षे केंद्र आणि महाराष्ट्रातील सत्तेत भागीदार राहिले.

Loading...

थोडे मागे जाऊया. १९९९ मध्ये सोनिया गांधी या परदेशी मूळाच्या असल्याच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी काँग्रेसविरोधात अचानक बंड केले. त्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना केली. मात्र अवघ्या सहा महिन्यांत पुन्हा काँग्रेससोबत हातमिळवणी करून शरद पवार यांनी महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.

२०१४ मध्ये भाजपच्या विजयामुळे शरद पवार पाच वर्षे सत्तेबाहेर राहिले. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील मतभेदांचा पवारांनी पुरेपूर फायदा उचलला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत ‘महाविकास आघाडीचे सरकार’ स्थापन करुन दाखवले. मात्र, हे सरकार अडीच वर्षांत कोसळले. त्यानंतर भाजपने आधी शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली.

पोस्ट येथे वाचा –

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचा उत्तराधिकार कोण ? संघर्ष आधी पासूनच होता. मुलगी सुप्रिया सुळे की पुतणे अजित पवार? शरद पवारांनी अखेर आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना पसंती दिली. एवढेच नव्हे, तर त्यांनी लागलीच राजकीय निवृत्ती घेण्याची घोषणा देखील केली. मात्र, शदर पवार यांनी निवृत्त होऊ नये अशा हट्ट कार्यकर्त्यांनी केला आणि त्यांनी हा प्रस्ताव अखेर मागे घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्या संमतीने त्यांच्या राजकीय वारसदार असलेल्या सुप्रिया सुळे यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर काही आठवड्यांतच भाजपाने पवारांचे पुतणे अजित पवारांना हाताशी घेऊन बंड घडवले. ज्या पक्षाची स्थापना स्वत: शरद पवार यांनी केली होती, त्याचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील अखेर अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाला मिळाले.

पण नशिबाने त्यानंतर शरद पवार यांना पुन्हा एकदा साथ दिली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप महायुतीला मोठा फटका बसला. आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ८ जागा मिळाल्या. लोकसभेत यापूर्वी त्यांच्या पक्षाला एवढे यश कधीच मिळाले नव्हते. मात्र, अवघ्या ६ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण चित्र पालटले.लाभार्थी योजनांमुळे भाजपा आघाडी पुन्हा सत्तेत आली आणि शरद पवारांच्या पक्षाचे केवळ १० च आमदार निवडून आले.

त्यानंतर शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून अजित पवार पुढे आले. मात्र, याच वर्षी विमान अपघातात अजित पवार यांचे अचानक निधन झाले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण होऊन ते पुन्हा एकत्र येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी वेगळा मार्ग निवडत त्या स्वतः उपमुख्यमंत्री झाल्या.

याच वर्षी मार्चमध्ये महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक झाली, तेव्हा शरद पवार यांची निवड होण्याची शक्यता फारशी दिसत नव्हती. जवळपास ६० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार इतके हतबल कधी दिसले नव्हते. अखेर काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी एकत्र येत शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले. सुप्रिया सुळे यांनी पित्यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत जोरदार प्रयत्न केले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शरद पवार यांनी गांधी आणि ठाकरे कुटुंबीयांचे आभार मानले.

आता शरद पवार यांचा पक्षही पुन्हा एनडीएच्या वाटेवर निघाल्याचे चित्र आहे. सोमवारी येणाऱ्या परिसीमन विधेयकाला (Delimitation Bill) पाठिंबा देण्याची पवार यांची तयारी आहे. भविष्यात ते केंद्र सरकारमध्येही सहभागी झाले, तर आश्चर्य वाटायला नको. असे घडले, तर जवळपास २२ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या राजकीय चक्राची पूर्णता होईल.

शरद पवारांची राजकीय टाइमिंग योग्य आहे की अयोग्य, हे मात्र येणारा काळच ठरवेल..

( ज्येष्ठ पत्रकार मिलिंद खांडेकर यांच्या एक्सवरील हिंदी पोस्टचा स्वैर अनुवाद )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us